काका साठेंना 84 व्या वयात संचालक पदाची एवढी हौस का? बाजार समिती वरून उत्तरमध्ये राजकारण तापले!
सोलापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र येत्या बुधवारी स्पष्ट होणार आहे परंतु या निवडणुकीसाठी तब्बल 369 जणांनी आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
यंदाची निवडणूक ही सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी आणि हमाल तोलार यांच्या मतदानाने होत आहे तरीही तब्बल पावणे चारशे जणांनी अर्ज दाखल केला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात मात्र तालुक्याचे जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी आपल्या 84 व्या वयात संचालक पदासाठी अर्ज दाखल केल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. त्याचबरोबर यापूर्वी संचालक राहिलेले मार्डीचे माजी सरपंच अविनाश मार्तंडे, माजी संचालक प्रकाश चोरेकर यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे.
या निवडणुकीत मोहोळचे आमदार राजू खरे यांनी लक्ष घालणार असल्याचे सांगितले. आता या रणांगणात माजी आमदार यशवंत माने यांनी पण उडी घेतली आहे. त्यांनी शासकीय विश्राम गृहावर मार्तंडे व चोरेकर यांच्याशी चर्चा केली. उत्तर सोलापूर तालुक्यातून काका साठे यांनी अर्ज दाखल केल्याने यावर माने यांनी टीका केली. मुलगा जितेंद्र साठे, नातू जयदीप असताना किंवा अनेक कार्यकर्ते असताना त्यांना 84 व्या वयात संचालक व्हायची हौस का असा प्रश्न उपस्थित केला.

उत्तर तालुक्यातून दिलीप माने यांचेच बाजार समितीवर वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे आता दोन्ही माने आता कुणाला संधी देतात याकडे लक्ष लागले आहे.