लोकसभा मतदानासाठी सोलापूर प्रशासन यंत्रणा सज्ज ; मतदान केंद्रात नागरिकांसाठी आहेत या सुविधा ; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची सोलापूरकरांना विनंती
सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोलापूरची प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी यांची उपस्थिती होती.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यातील 42-सोलापूर व 43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जिल्हा निवडणूक प्रशासनाचे स्वच्छता झालेली असून दोन्ही मतदार संघातील एकूण 40 लाख 21 हजार 573 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदार केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद व अप्पर जिल्हाधिकारी तथा 43 लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांनी केले आहे.
42-सोलापूर लोकसभा मतदारसंघ ची माहिती-
मतदार –
42(अनु.जा.) लोकसभा मतदारसंघात मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण व पंढरपूर या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या मतदारसंघाचे एकूण मतदार संख्या 20 लाख 30 हजार 119 इतकी असून यामध्ये 10 लाख 41 हजार 470 पुरुष मतदार, 9 लाख 88 हजार 450 स्त्री मतदार व 199 तृतीयपंथी मतदार असून 1 हजार 968 मतदान केंद्रावर हे सर्व मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
*मतदान केंद्रावरील सुविधा-
42 सोलापूर व 43 माढा लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर रॅम्पची सुविधा, पिण्याचे पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृह, मतदाराकरिता सावलीची व्यवस्था, उष्माघातापासून बचावासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार ओआरएसयुक्त पाण्याचा पुरवठा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरची सुविधा, स्वयंसेवकांची नियुक्ती, महिला व जेष्ठ मतदारासाठी स्वतंत्र रांग, मतदान केंद्राचा परिसर व स्वच्छतागृह साफसफाई, पाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रासाठी भिन्न रंगाचा वापर, मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी मतदार मदत कक्षाची स्थापना या सुविधा देण्यात आलेल्या आहेत.
*आदर्श मतदान केंद्र –
42 सोलापूर लोकसभा मतदारसंघात युवक मतदान केंद्र 11, महिला मतदान केंद्रे 11 व दिव्यांग मतदान केंद्र 6 निर्माण करण्यात आलेली आहेत. तसेच 14 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. त्याप्रमाणेच 1 हजार 42 मतदान केंद्रावर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे.
*कर्मचारी नियुक्ती व वाहतूक व्यवस्था-
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी 8 हजार 660 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून वाहतुकीकरीता 334 मार्ग निश्चित केलेले असून त्यासाठी 234 बस, 81 छोट्या बस व 75 जीप वापरण्यात येणार आहेत तसेच 196 सेक्टर ऑफिसर यांना स्वतंत्र जीप देण्यात आली आहे.
*स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्र-
सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाल्यानंतर ईव्हीएम/ व्हीव्हीपॅट मशीन शासकीय धान्य गोदाम रामवाडी सोलापूर येथे ठेवण्यात येणार असून दिनांक 4 जून 2024 रोजी ची मतमोजणी देखील रामवाडी गोदाम येथे होणार आहे.
*85 वर्षे पुढील मतदार व अपंग मतदार-
फॉर्म 12 ड नुसार मंजूर करण्यात आलेले एकूण मतदार 1450 त्यापैकी प्रत्यक्ष घरामध्ये जाऊन घेतलेले मतदान तेराशे 46 दोन वेळा भेट देऊनही घरात न आढळून आलेले मतदार 96 घर भेटीदरम्यान एकूण झालेल्या मतदानाची टक्केवारी 93.32% इतकी आहे.
*इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट (ईडीसी)-
42 सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये स्वतः मतदारांनी ज्यांनी निवडणूक कर्तव्य नेमलेले आहे असे अधिकारी कर्मचारी यांना शंभर टक्के ईडीसी चे वाटप करण्यात आलेले आहे. एकूण 9464 EDC वाटप करण्यात आलेले आहेत.
43-माढा लोकसभा मतदारसंघाची माहिती-
*मतदार संख्या-
43 माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण व माण या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यातील फलटण व माण हे विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातील असून माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाची एकूण मतदार संख्या 19 लाख 91 हजार 454 इतकी असून यामध्ये 10 लाख 35 हजार 678 पुरुष मतदार, 9 लाख 55 हजार 706 स्त्री मतदार तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 70 इतकी आहे. हे सर्व मतदार माढा लोकसभा मतदारसंघातील 2 हजार 30 मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघात 10 हजार 236 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.
*आदर्श मतदान केंद्र-
43 माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत युवा मतदान केंद्र 10, महिला मतदान केंद्र 12 व दिव्यांग मतदान केंद्र 6 करण्यात आलेली आहेत.
*85 वर्षे पुढील मतदार व अपंग मतदार-
माढा लोकसभा मतदारसंघात फॉर्म 12 ड मंजूर करण्यात आलेले एकूण मतदार 2226 होते तर त्यापैकी घरामध्ये जाऊन प्रत्यक्षात घेतलेले मतदान 1762 इतके आहे. दोन वेळा भेट देऊनही घरात न आढळून आलेले मतदार 102 इतके आहेत तर घरभेटीदरम्यान एकूण झालेल्या मतदानाची टक्केवारी 94.52% इतकी आहे. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी 362 पैकी 316 म्हणजे 87.29 टक्के मतदान झाले आहे.
*इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट (ईडीसी)- 43 माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये स्वतः मतदार असल्याने ज्यांना निवडणूक कर्त्यावर नेमलेले अधिकारी कर्मचारी यांना शंभर टक्के ईडीसी वाटप झालेले आहे. एकूण सात हजार सहाशे सहा ईडीसी प्रमाणपत्रे वाटप करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे.
*कायदा व सुव्यवस्था-
सोलापूर शहरात शहर पोलीस विभागाच्या वतीने तर ग्रामीण भागात पोलीस जिल्हा अधीक्षक ग्रामीण यांच्यावतीने त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आलेला आहे. दिनांक 7 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया शांततामुळे व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार आणि पोलीस अधीक्षक ग्रामीण शिरीष सरदेशपांडे यांनी दिली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस विभागाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात केल्याचेही त्यांनी सांगितले.
*मतदान कर्मचारी व साहित्य मतदान केंद्रावर पोहोचले-
दिनांक 6 मे 2024 रोजी सकाळपासूनच 42 सोलापूर व 43 माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयातून दिनांक सात मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेसाठी निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी तसेच ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनरी व आवश्यक निवडणूक साहित्य घेऊन मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत.
*42 सोलापूर व 43 माढा लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया दिनांक सात मे 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत होणार आहे. यासाठी आवश्यक सर्व तयारी तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तरी उपरोक्त दोन्ही मतदारसंघातील सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा आपला हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.