महाराष्ट्राच्या शांभवीने जर्मनीत रोवला भारताचा झेंडा ; या स्पर्धेत पटकावले गोल्ड मेडल
सोलापूर येथील उपजिल्हाधिकारी श्रावणकुमार श्रीरंग क्षीरसागर यांची कन्या, कु. शांभवी श्रवण क्षीरसागर हिने जर्मनीतील सूल येथे १९ ते २७ मे २०२५ दरम्यान पार पडत असलेल्या ISSF जूनियर वर्ल्ड कप रायफल शूटिंग स्पर्धेत अपूर्व कामगिरी करताना भारताचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले आहे.
शांभवीने महिलांच्या १० मीटर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावताना ऑलिंपिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती चीनची Huang Yuting हिला मात दिली. तिच्या या ऐतिहासिक विजयामुळे भारताने एका प्रतिष्ठित सुवर्णपदकावर कब्जा केला आहे.
तसेच, शांभवीने याच स्पर्धेतील मिक्स टीम इव्हेंट (मुलं व मुली – मिल्स राऊंड) मध्येही उत्तम कामगिरी करत कांस्यपदक (Bronze Medal) जिंकले आहे. हे दुहेरी यश केवळ तिच्या व्यक्तिगत मेहनतीचेच नव्हे, तर तिच्या कुटुंबियांचे, विशेषतः तिच्या पालकांचे आणि प्रशिक्षकांचे योगदान अधोरेखित करणारे आहे.
शांभवीच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिची ही कामगिरी आगामी पिढीच्या खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरत असून, २०२८ ऑलिंपिक स्पर्धेत तिचे स्थान निश्चित होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.
शांभवीने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. तिचे जितके कौतुक केले जाईल, तितके थोडेच आहे.