प्रणिती शिंदे यांनी राम सातपुतेंना भरला दम ; खबरदार, सोलापूरची एकी बिघडवाल तर…
सोलापूर : सोलापूरची निवडणूक हातातून गेल्याचे समजल्यानंतर आता भाजपच्या नेत्यांचे फोन कॉल सुरू झाले आहेत. तुमच्या मागे इडी लावीन, तुमचा कारखाना सिल करेन अशा धमक्या नेत्यांना देण्यात येत आहेत. कुणी बाहेरचा येऊन सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करतोय, शेतकरी हैराण आहे, सोलापूरकर पाण्या वाचून परेशान आहेत, विकासाचे कोणतेही मुद्दे नाहीत म्हणून आता समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न होतोय. खबरदार जर सोलापूरची एकी बिघडवली तर गाठ माझ्याशी आहे सोलापूर हे सर्वधर्मसमभावाचे आणि क्रांतिकारी शहर आहे या शब्दात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचे नाव न घेता थेट दम भरला.
महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रणिती बोलत होत्या.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना 15 लाखाचे स्वप्न दाखवलेले स्वप्न हे खोटे होते हे सिद्ध झाले, स्मार्ट सिटी बनवण्याचे नाटक केले, एक दिवशी महाराष्ट्र गुजरातला चालवायला देतील, त्यांना मताची किंमत नाही राहिली.
भाजपने दहा वर्ष सोलापूरला विकासापासून दूर नेले आता उमेदवाराच्या चेहऱ्याकडे बघू नका म्हणतात, किती फसवणार आम्हाला, म्हणूनच महाविकास आघाडीची गरज देशाला आहे.
सोलापुरात पंतप्रधानांच्या सभेला फक्त 20 हजार लोक, आमच्या गड्डा यात्रेला यापेक्षा जास्त लोक असतात, अशी खिल्ली उडवत पंधरा वर्ष आमदार म्हणून संधी दिली, कामामुळे आशीर्वाद दिला, हे नाते कोणी तोडू शकत नाही, बहीण आणि लेकीचे नाते आहे, रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका, सोलापूर जिल्हा दुष्काळ मुक्त करणारच, सोलापूर खड्डे मुक्त करणार, आय टी पार्क आणणारच, सोलापुरात विमान सेवा सुरू करणार अशी प्रतिज्ञा प्रणिती शिंदे यांनी केली.