सोलापूरात मराठा समाजाची शिवरायांच्या साक्षीने शपथ ; महायुतीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावातील मराठा समाजाने रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेऊन सामूहिक शपथ घेत यापुढे भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना आम्ही लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही.
महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा विषय अद्यापही मिटलेला नाही. मागे काही दिवसात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने बरेच राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले. हा विषय सभागृहातील गाजला. सभागृहात मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान आता यामुळे राज्यातील मराठा समाज आणखीच पेटून उठला आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर तालुक्यात असलेल्या शहरापासून दहा किलोमीटर अंतरावरील कोंडी या गावात मराठा समाजाने सामूहिक शपथ घेतली. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मिटणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांना या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही.
सोमनाथ राऊत म्हणाले, निवडणुका आल्या की मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले जाते आणि इलेक्शन झाले की पुन्हा त्यांचाच माणूस जनहित याचिका दाखल करून मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवतो. जोपर्यंत भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत, मराठा समाज भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना मतदान करणार नाही असा निर्णय झाल्याचे सांगितले.