सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का? हा जिवाभावाचा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत
सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस नवनवीन राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे शिवसेना या तिघांची महायुती असल्याने आणि सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक मोठमोठे नेते निष्ठा बाजूला ठेवून पक्ष सोडत आहेत.
याच पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण त्यांचा एकनिष्ठ कट्टर आणि जिवाभावाचा कार्यकर्ता पक्ष सोडण्याच्या तयारीत दिसून येतोय. त्या या कार्यकर्त्याचे नाव आहे बळीराम काका साठे.


शरद पवार आणि काका साठे यांच्यात केवळ दोन वर्षाचे अंतर आहे. काका साठे हे शरद पवार यांचे अतिशय निष्ठावंत समर्थक आहेत. ज्यावेळी पक्ष अडचणीत असताना काका साठे यांनी जिल्हाध्यक्ष पद घेतले आणि सांभाळले. परंतु दोन दिवसांपूर्वी अचानक त्यांना सोलापूरच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हटवून त्यांना प्रदेश उपाध्यक्ष करण्यात आले.
या निवडीमुळे काका साठे यांच्या सर्वच कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. काका साठे यांच्या जागेवर मोहिते पाटील समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ घालण्यात आली.
अचानक घडलेले या राजकीय घडामोडीमुळे सोलापुरातील काका साठे तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत रविवारी वडाळ्यामध्ये समर्थकांची बैठक घेण्यात आली यामध्ये शरद पवार यांच्या भूमिकेवर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि जर निष्ठावंतांना डावलेले जात असेल तर पक्ष का सोडू नये असा प्रश्न साठे यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. न सांगता पदावरून कमी केले त्याचे प्रचंड दुःख असून शरद पवार यांनी बोलावून पदाचा राजीनामा द्यायला सांगितला असता तरी प्रेमाने दिला असता, मोहिते पाटील यांचेच ऐकायचे असेल तर त्यांचा एक खासदार राष्ट्रवादीत आणि दुसरा आमदार भाजपमध्ये आहे ते कितपत योग्य आहे असे अनेक प्रश्न काका साठे यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केले आहेत.
पक्ष सोडायचाच असेल तर अजित पवार गटात जायचे की एकनाथ शिंदे गटात याचा निर्णय काका साठे यांनी घ्यावा तो सर्वांना मान्य राहील असे ठरले असल्याची माहिती काका साठे यांच्या समर्थकांकडून मिळाली. आता काका साठी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे अजित पवार आणि काका साठे यांचे यापूर्वीचे संबंध पाहता शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे कार्यकर्त्यांचा ओढा जास्त असल्याचे ऐकण्यास मिळाले. या बैठकीला तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, युवक अध्यक्ष शरद माने, मनोज साठे, शिवाजी ननावरे, जितेंद्र शिलवंत, जितेंद्र साठे, शशिकांत मार्तंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.