‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार
सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास ठार मारण्यात आले आहे. ही घटना सोलापूर पुणे महामार्गावरील मोहोळजवळ घडली.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पुण्यातील काळेवाडी पोलीस स्टेशन परिसरात अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेला शाहरुख रहीम शेख (रा.हडपसर, पुणे ) हा सोलापूर -पुणे महामार्गावरील लांबोटी येथील नरोटे वस्ती येथे राहत असल्याची माहिती पुणे क्राईम ब्रँच यांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी त्यांनी रात्री घटनास्थळी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पोलिसांवर पिस्टलमधून प्रारंभी पोलीसांवर फायर केले. यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे.
याबद्दल अधिकची माहिती अशी की, पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीचा सराईत गुंड आणि मोका अंतर्गत फरार असलेला आरोपी शाहरुख ऊर्फ अट्टी रहीम शेख (वय २३, रा. गल्लीनं. २३/ए, सय्यद नगर, हडपसर) याचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळजवळ लांबोटी गावात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. शाहरुख हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. हडपसर, वानवडी आणि कोंढवा पोलीस ठाण्यात त्याचे विरोधात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी केलेल्या मोका कारवाईनंतर तो फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला आरोपी शाहरुख हा सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावातील नातेवाईकांकडे लपून बसला असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानंतर गुन्हे शाखेचे कर्मचारी त्याला पकडण्यासाठी शनिवारी मध्यरात्री लांबोटी गावात गेले. पहाटे अंधारात पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर शाहरुखने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी देखील गोळीबार करत त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. या चकमकीत शाहरुख गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मयत शाहरुखच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू असून त्याच्या पत्नीने पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप केला आहे.
काय आहे शाहरुख शेख याचा गुन्हेगारी इतिहास?
शाहरुख हा पुण्यातील टिपू पठाण टोळीचा सक्रिय सदस्य होता. या टोळीने खंडणी, बेकायदेशीर धंदे, दहशत निर्माण करणं, वसुली यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे पुण्यात आपला जम बसवला होता. शाहरुख याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा, खंडणी आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा तपास सुरु होता. पोलिसांनी मोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई केली होती आणि तो सध्या फरार होता.