“खरे’च की रे बाबा ! दिकटो ‘सेम टू सेम”
सोलापूर : मोहोळ तालुक्याचे पर्मनंट आमदार म्हणून त्यांची ओळख होती त्यांचा पराभव आमदार राजू खरे आणि उमेश पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमने करून दाखवला. मोहोळ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघातून राजू खरे केवळ नऊ दिवसात आमदार झाले. त्यांची पर्सनालिटी आणि डॅशिंग स्वभाव यामुळे ते सध्या सोलापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहेत.
शुक्रवारी सोलापुरात राज्याचे नूतन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक पहिल्यांदाच झाली. या बैठकीला सर्व खासदार आणि आमदार उपस्थित होते. यावेळी मोहोळचे आमदार राजू खरे यांनी काळा ड्रेस परिधान करून बैठकीला उपस्थिती लावली. विखे पाटील हे मागच्या सरकारमध्ये महसूल मंत्री होते त्यावेळी त्यांनी मोहोळ तालुक्यात अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर केले त्यामुळे राजन पाटील आणि त्यावेळचे आमदार यशवंत माने यांच्या विरोधात संपूर्ण मोहोळ मधून जन आंदोलन झाले आणि झालेल्या विधानसभा निवडणुकीत याचा फायदा राजू खरे यांना झाला. ते तीस हजारहून अधिक मताधिक्याने विजयी झाले.
त्याबद्दल अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा निषेध करत राजू खरे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार झाल्याबद्दल आभारही मानले.



याच बैठकीत राजू खरे ज्या ठिकाणी बसले होते त्यांच्या शेजारी उजनी भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे हे सुद्धा बसले होते. उपस्थित सर्वांचेच लक्ष या दोघांकडे गेले असता “अरे बाबा सेम टू सेम” असेच शब्द अनेक आमदारांच्या तोंडून मजेशीरपणे निघाले.
अधीक्षक अभियंता साळे आणि आमदार खरे हे दोघेही आपल्या शरीरयष्टीने समान आहेत. आणि चेहराही दोघांचा सारखाच दिसतो. त्यामुळे हा विषय या बैठकीत चर्चेचा ठरला याची चर्चा बाहेरही ऐकण्यास मिळाली आणि ते दोघे बसलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.