“जहीर नाम सुन के बॉलर समजे क्या? झेडपी ग्रामपंचायत का फायर हू मै”
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसणारे अनेक कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांना चांगली टेबल कशी मिळवायची ही टॅक्ट माहिती आहे. झेडपी मध्ये असेही अनेक कर्मचारी आहेत की त्यांच्याशिवाय त्या विभागाचे काम पुढे जात नाही त्यामुळे अशा काही कर्मचाऱ्यांची डिमांड प्रचंड पाहायला मिळते.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामध्ये कार्यालयीन अधीक्षक म्हणून पुन्हा एकदा जहीर शेख यांची मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी नियुक्ती केली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जाहीर शेख यांना त्या विभागातून काढून त्यांची बांधकाम विभागात तडकाफडकी बदली केली होती.
शेख यांच्या जागेवर दुसरा कर्मचारी बोरुटे देण्यात आला होते. दरम्यान आव्हाळे यांची बदली झाली. मागील काही महिन्यांमध्ये जहीर शेख यांच्या जागेवर दिलेल्या कर्मचाऱ्यांना कामकाज करताना अनेक अडचणी आल्या त्याने स्वतः या विभागात काम करण्यास नकार दिल्याचे लेखी पत्र दिले असल्याचे समजले.
यावरून जहीर शेख यांची ग्रामपंचायत विभागात किती डिमांड आहे हे दिसून आले. जहीर शेख यांनाच या विभागात एवढा इंटरेस्ट का? असा प्रश्न संघटनांचे पदाधिकारी करीत आहेत. या पदासाठी बहुजन कर्मचारी महासंघाचे गिरीश जाधव हे इच्छुक होते परंतु त्यांच्या ऐवजी अखेर झहीर शेख यांनाच ग्रामपंचायत विभागात घेण्यात आले.
मागील काही महिन्यात ग्रामपंचायत विभागात कामकाज करताना येणाऱ्या अडचणी या मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्या पदावर जहीर शेख हेच का पाहिजेत हे सुद्धा पटवून सांगण्यात आले त्यानंतरच जंगम यांनी जहीर शेख यांची नियुक्ती केल्याचे सांगण्यात आले.