अकलूजच्या शेटेंची बदली थेट कर्नाटक बॉर्डरवर ; डीसीसी बँकेची कारवाई ; माळशिरसच्या भाजपने उडवली खिल्ली
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार साखर कारखानदारांभोवती आता हे नवीन सरकार फास आवळताना दिसत आहे. त्यातच वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांवरही आता कारवाईचा दणका जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाकडून बसत आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अकलूज यशवंत नगर येथील लिपिक एच बी शेटे यांचे तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांना अकलूज वरून थेट कर्नाटक बॉर्डर अर्थात अक्कलकोट तालुक्यात पाठवण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी ही कार्यवाही केली.
या कार्यवाहीनंतर माळशिरस मधील भारतीय जनता पार्टीने या प्रकरणाची खिल्ली उडवली असून फेसबुक या सोशल मीडियावर पगार जिल्हा बँकेकडून आणि चाकरी मोहितेंची असे म्हणून जिल्हा बँकेचा लिपिक शेटे आप्पा निघाला मोहिते पाटील यांचा पीए अशा शब्दात टार्गेट करण्यात आले आहे.