मोहोळ मध्ये या ‘पाटलांचा’ पराभव होतो उमेश दादांनी ‘खरे ‘ करून दाखवले ; राजूंच्या रूपात ओरिजनल आमदार झाला
सोलापूर : मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांनी दणदणीत विजय मिळवत विद्यमान आमदार अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांचा पराभव केला. या विजयाने मोहोळ मध्ये त्या पाटलांचा पराभव होतो हे उमेश पाटील यांनी खरे करून दाखवले. राजू खरे यांच्या रुपात ओरिजनल आमदार झाल्याची प्रतिक्रिया समोर येत आहे. अप्पर तहसील कार्यालय अनगरला नेल्याचा फटका माजी आमदार राजन पाटील यांना या पराभवाने बसल्याचे बोलले जात आहे.
मोहोळचे पर्मनंट आमदार म्हणून ओळख असलेल्या माजी आमदार राजन पाटील हे ज्यांच्या बाजूने असतात तिथे आमदार फिक्स असे चित्र मागील तीन टर्म पहायला मिळाले. त्या जोरावर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत यशवंत माने हे विजयी झाले होते. माने यांनी शेकडो कोटींचा निधी या विधानसभा मतदारसंघात दिला. एकूणच यशवंत माने हे यावेळेसही निश्चित विजय होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
परंतु अपर तहसील कार्यालयाचा विषय आला. हे कार्यालय अनगर या ठिकाणी नेण्यात आले. या अपर तहसील कार्यालयाला प्रचंड विरोध झाला. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी हा विषय लावून धरला. यामध्ये नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली राजन पाटील यांच्या विरोधात संपूर्ण तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस तसेच इतर पक्षाचे नेते एकत्रित आले.
या प्रकरणात उमेश पाटील यांची बदनामी झाली त्यांना राष्ट्रवादी पक्ष सोडावा लागला. मात्र त्यांनी आपला विरोध कायम ठेवला. विधानसभा निवडणूक लागली. यशवंत माने यांना उमेदवारी जाहीर झाली. दुसरीकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरुवातीला सिद्धी कदम यांना उमेदवारी मिळाली पण त्या उमेदवारीला विरोध झाला शेवटी राजू खरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, उमेश पाटील, शिवसेना नेते दीपक गायकवाड, शिवसेनेच्या सीमा पाटील, भाजपचे विजयराज डोंगरे, रमेश बारसकर, मानाजी बापू माने अशी नेतेमंडळी राजू खरे यांच्या पाठीशी होती.
या सर्व नेत्यांनी एकत्रित आणि समन्वयाने ही निवडणूक हाताळली त्यामुळेच राजू खरे यांचा विजय झाला. या निवडणुकीत किंगमेकर म्हणजे उमेश पाटील ठरले आहेत. यशवंत माने यांचा राजू खरे यांनी तब्बल 30 हजाराच्या फरकाने पराभव केला आहे. राजू खरे यांच्या रूपात मोहोळला पहिल्यांदाच ओरिजनल आमदार मिळाल्याच्या भावना आंबेडकरी समाजातून व्यक्त होत आहेत.