सचिन कल्याणशेट्टी 2.0 अक्कलकोटकरांनी दुसऱ्यांदा भरभरून दिले ! सिद्धाराम म्हेत्रे यांचा धक्कादायक पराभव
सोलापूर : अक्कलकोटचे विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी दुसऱ्यांदा विजय संपादन करत काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे यांचा तब्बल पन्नास हजाराच्या मताधिक्क्याने पराभव केला. एक लाख चाळीस हजाराहून अधिक मते सचिन कल्याणशेट्टी यांना मिळाली आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर तयार झालेले वातावरण पाहता अक्कलकोट मध्ये भाजपला ही निवडणूक सोपी नव्हती परंतु आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मागील सहा महिन्यांमध्ये केलेले उत्कृष्ट नियोजन आणि सर्व समाजामध्ये ठेवलेला संपर्क हे या विजयाचे श्रेय म्हणावे लागेल.
काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सहाव्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी सिद्धाराम म्हेत्रे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे यंदा म्हेत्रे हे बाजी मारतील अशी चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमधून होती त्या पद्धतीने मतदान ही झाल्याचे पाहायला मिळाले पण काँग्रेसला अपयश आले.
सचिन कल्याणशेट्टी यांनी मागील पाच वर्षात अक्कलकोट मध्ये विकासाला महत्त्व देत प्रचंड निधी खेचून आणला प्रत्येक गावोगावी त्यांनी रस्ते केले, अक्कलकोट मधील मुस्लिम समाज, आंबेडकरी समाज, यासह लिंगायत समाज, धनगर समाज, मराठा समाज, बंजारा समाज या सर्वांना सोबत घेऊन प्रत्येक गावात विकासाचा मोठा निधी दिला. त्यामुळे तालुक्यावर त्यांची पकड राहण्यात ते यशस्वी झाले. तसेच शेवटच्या क्षणी आनंद तानवडे आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात मनोमिलन झाल्याने त्याचाही बराच फायदा भाजपला झाला.
या निवडणुकीत अक्कलकोट करांनी सचिन कल्याणशेट्टी यांना भरभरून मते दिली आहेत, 2019 च्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत त्यांना तब्बल 15000 हून अधिक मते जादा मिळाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटवर्तीय म्हणून कल्याणशेट्टी यांच्याकडे पाहिले जाते. आता मंत्रिमंडळात कल्याणशेट्टी यांना स्थान मिळणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.