गौरवास्पद ! सोलापूरचे जेष्ठ विधिज्ञ निलेश जोशी औरंगाबाद उच्य न्यायालयात विशेष सरकारी अभियोक्ता
धाराशिव जिल्ह्यातील अत्यंत संवेदनशील व गाजलेल्या खटल्यासाठी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात ॲड. निलेश जोशी यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
हे पण वाचा : शरद पवार यांच्या जीवावर मोठे झाले
तुळजापूर तालुक्यातील एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अंकुश वडणे नावाच्या नराधमाने 30/08/2022 रोजी लैंगिक अत्याचार केला होता.सदर पीडिता ही तिच्या घराच्या पाठीमागे शौचास गेली असता तिला शेजारील शेतात नेऊन आरोपी अंकुश वडणे याने लैंगिक अत्याचार केला. बराच वेळ होऊन ही मुलगी घरी न आल्याने मुलीची आई, शेजारील लोक व गावकरी यांनी मुलीचा शोध घेत असताना आरोपी हा पिडीते सोबत दुष्कृत करत असताना त्यांना दिसला. त्यावेळी ग्रामस्थांनी व लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी अंकुश वडणे विरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
या घटनेचे पडसाद संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात पडून विविध राजकीय पक्षांनी व संघटनांनी आंदोलने व मोर्चे काढून सदरची घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असून सदर गुन्हाची तात्काळ चौकशी करून, या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून, सदरचे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपी शिक्षा द्यावी. अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार तुळजापूर, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त, धाराशिव यांना देण्यात आलेले होते. जनसामान्यांच्या व ग्रामस्थांच्या संतप्त भावना पाहून सदर प्रकरणात विशेष सरकारी विधीज्ञांच्या नेमणुक, आरोपी विरुद्ध लवकरात लवकर दोषारोप पत्र पाठवून सदरचा खटला जलद गतीने चालवण्याचे व आरोपीस जास्तीत जास्त कडक शिक्षा देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर संपूर्ण जमाव शांत झाला होता. त्यानंतर सदर प्रकरणात धाराशिव येथील पोलीस आयुक्त व अप्पर पोलीस आयुक्तांनी विशेष लक्ष घालून आरोपी विरुद्ध धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलेले होते.
या प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाच्यावतीने सोलापूर येथील जेष्ठ विधिज्ञ निलेश दत्तात्रय जोशी यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आलेले होती.
या प्रकरणाची सुनावणी ही प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांच्या न्यायालयात सुरू झाली. सदर प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता निलेश जोशी यांनी एकूण 22 साक्षीदार तपासून प्रत्यक्षदर्शी, वस्तुस्थितीजन्य, वैद्यकीय, रासायनिक व तांत्रिक पुरावा देऊन आरोपी अंकुश वडणे यानेच अल्पवयीन पीडीतेवरती अत्याचार केला असल्याचे निर्विवादपणे व सबळ पुराव्याच्याआधारे शाबीत केल्याने मे.न्यायालयाने आरोपी अंकुश वडणे यास मरेपर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलेली होती.
सदर शिक्षेच्या विरुद्ध आरोपी अंकुश वडणे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात अपील दाखल केलेले असून सदर अपीलाच्या कामीदेखील ॲड. निलेश जोशी यांनी सदर खटल्याच्याकामी केलेल्या कामाची दखल घेवून शासनाच्यावतीने बाजू मांडण्यासाठी त्यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नेमणूक करण्यात आलेले आहे.
या प्रकरणात महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेली मानधनाची रक्कम रु. तीन लाख हि विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त करण्यात आलेले जेष्ठ ॲड. निलेश जोशी सोलापूर यांनी शासनातर्फे पिडीत बालकांसाठी सुरू केलेल्या मनोधैर्य योजनास दिले आहेत. यापूर्वी ॲड. निलेश जोशी यांनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी व विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून केलेल्या अनेक संवेदनशील प्रकरणात शासनाच्यावतीने काम करून अनेक आरोपींना गजाआड पाठविले आहे.
ॲड. निलेश जोशी यांच्या नेमणूकीमुळे सर्व स्तरातील लोकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.