रमेश कदम एमआयएमचे उमेदवार? स्थानिक नेत्यांची सोलापुरात भेट ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणूक रंगतदार अवस्थेत असून या निवडणुकीला आता वेगळे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला कारणही तसेच असून मोहोळ तालुक्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी सोलापुरात बालाजी सरोवर या ठिकाणी एमआयएम पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.
एम आय एम पक्षाकडून अनेकांनी सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी इच्छा व्यक्त केल्याची माहिती मिळाली होती त्यामध्ये एका माजी आमदाराचा समावेश असल्याचेही समोर आले होते. दरम्यान एमआयएमने आपला पत्ता ओपन केला असून त्यामध्ये मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी एमआयएमचे माजी नगरसेवक गाझी जागीरदार, अझहर हुंडेकरी, कमरुल शेख, नसीम खलिफा, मोबिन नदाफ, अब्दुल मोहोळकर,विशाल बंडे यांनी रमेश कदम यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आले आहेत.
आता सोलापूर लोकसभेसाठी रमेश कदम हे एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवणार का? असा प्रश्न उपस्थित होत असून रमेश कदम हे सोलापूरच्या निवडणूक रिंगणात आले तर निश्चितच या निवडणुकीला वेगळे वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु एकूणच देशात अनेक घटनांनंतर मुस्लिम समाजात तयार झालेली मानसिकता ही लोकसभा निवडणुकीत एम आय एम आपल्याकडे मतांच्या रूपात वळवू शकणार का? हाही मोठा प्रश्न समाजात उपस्थित होऊ शकतो हे तितकेच महत्वाचे आहे.