आ. प्रणिती शिंदेंचा गैरसमज ; मराठा समाज बांधवांचा त्यांचा निवासस्थानासमोर प्रचंड गोंधळ
सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने येत्या 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे, तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी मराठा समाजाने राज्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन करीत निवेदने दिली. आमदार विजय देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करून सर्व मराठा बांधव हे सात रस्ता परिसरातील आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानासमोर आले.
यावेळी त्या ठिकाणी ठिय्या मांडून घोषणाबाजी केली आमदार प्रणिती शिंदे या मुंबईमध्ये पक्षाच्या अधिवेशनात असल्याने त्यांना फोन लावण्यात आला परंतु इथल्या गोंधळामुळे त्यांना स्पष्ट ऐकता आले नाही, त्यांचा गैरसमज झाला त्यांनी फक्त काँग्रेसच्याच आमदारांच्या घरासमोर आंदोलन कशाला भाजपचे सत्ताधारी आमदार आहेत तिथे का गेले नाहीत असा प्रश्न केला असता मराठा बांधवांमधून एकच गोंधळ उडाला, त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचा निषेध करण्यास सुरुवात केली.
हा गोंधळ बराच वेळ चालला शेवटी त्यांना व्यवस्थित सांगण्यात आले येणाऱ्या अधिवेशनात आपण निश्चित आरक्षणाचा मुद्दा ताकतीने मांडू असे आश्वासन आमदार शिंदे यांनी दिली त्यानंतर आंदोलकांनी स्विय सहाय्यक बंटी चंदनशिवे यांच्याकडे निवेदन देऊन तिथून पुढे आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले.