सोलापुरात मराठा बांधवांचे आमदारांच्या घरांसमोर आंदोलन ; मालक घरात, बापू दिल्लीत तर ताई मुंबईत ; देशमुख म्हणाले, मी कायम तुमच्या सोबतच
सोलापूर : मागील काही दिवसांपासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या 20 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्या अधिवेशनात सर्वच आमदारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एकमुखी मागणी करावी यासाठी राज्यभरात मराठा समाज प्रत्येक आमदारांच्या घरासमोर आंदोलन करीत आहे.
सोलापुरात तीन आमदारांपैकी विजयकुमार देशमुख हे आपल्या निवासस्थानी होते तर आमदार सुभाष देशमुख हे दिल्लीमध्ये आहेत आणि आमदार प्रणिती शिंदे या मुंबईत त्यांच्या पक्षाच्या अधिवेशनाला गेल्याने त्या भेटू शकल्या नाहीत. या दोन्ही आमदारांच्या स्वीय सहायकांनी निवेदने स्वीकारल्याचे समजले.
शुक्रवारी माऊली पवार यांच्या कार्यालयातून मराठा बांधवांनी एकत्रित येऊन रेल्वे लाईन परिसरातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आरक्षण मागणीच्या घोषणा देण्यात आल्या. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याने यावेळी मराठा बांधवांनी सरकारने तातडीने उपोषण स्थळी जाऊन त्यांचे उपोषण सोडवावे अशी आग्रही मागणी केली.
आमदार देशमुख यांनी बाहेर येऊन मराठा बांधवांचे निवेदन स्वीकारले. यावेळी संबोधित करताना देशमुख यांनी मी कायमच मराठा समाजाच्या सोबत आहे, तुमच्या आरक्षणाची मागणी मान्य होईल, सरकार त्यासाठी प्रयत्न करीत आहे. येणाऱ्या अधिवेशनात मी सुद्धा निश्चित आरक्षण देण्याची आग्रही मागणी करेन असे आश्वासन दिले.