Breaking ! आबा कांबळे खून खटल्यात सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
सोलापूर : शहरामध्ये सनसनाटी ठरलेल्या आबा कांबळे खून खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात संपले असून शुक्रवारी विशेष न्यायाधीश संगीता शिंदे यांनी या खून प्रकरणातील सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
1)सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे 2)रविराज दत्तात्रय शिंदे 3)अभिजीत उर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे 4)प्रशांत उर्फ आप्पा पांडुरंग शिंदे 5)निलेश प्रकाश महामुनी
6) तैसिफ गुडूलाल विजापुरे 7)नितीन उर्फ ईश्वर भालचंद्र खानोरे अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
यात थोडक्यात हकीकत अशी की, सन 2004 मध्ये सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे यांचा मुलगा ऋतुराज शिंदे याचा खून आबा कांबळे व त्याचे साथीदारांनी घडवून आणला होता, मुलाच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने दिनांक 07/07/2018 रोजी सुरेश उर्फ गामा शिंदे वगैरे वर नमूद आरोपींनी मिळून आबा कांबळे याचा मोबाईल गल्ली येथे धारदार शस्त्राने खून केला अशा आशयाची फिर्याद फिर्यादी शुभम श्रीकांत धूळराव यांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती. सदरचा खटला हा विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती संगीता आर. शिंदे यांचे न्यायालयासमोर चालला. खटल्याकामी सरकार पक्षातर्फे एकूण 28 साक्षीदार तपासण्यात आले. दिनांक 07/08/2019 रोजी सरकार पक्षातर्फे साक्षीदार क्र.1 यास तपासले होते.
न्यायालयाने निकाला करीता दिनांक. 26/04/2024 अशी तारीख नेमली होती.
शुक्रवारी दुपारी 1 .10 चे सुमारास न्यायालयाने आरोपी व आरोपींच्या वकिलांसमोर निकालाचे वाचन केले, त्याप्रमाणे सर्व सातही आरोपींना भा.द.वी कलम 302, 120ब, 143, 147, 148, 149 व शस्त्र कायदा कलम 4, 25 अन्वये दोषी धरले तर अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3(2) (va) अंतर्गत गुन्हा शाबित झाला नसल्याचे मत नोंदवले. त्यानंतर आरोपींचे वकिलांना शिक्षेबद्दल काही सांगायचे आहे का अशी विचारणा न्यायालयामार्फत करण्यात आली. शिक्षेबद्दल आरोपींतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की, “सदरची घटना ही दुर्मिळातली दुर्मिळ नाही, आरोपी नंबर 1 हे 81 वर्षाचे वयोवृद्ध इसम आहेत तर काही आरोपींना लहान मुले व परिवाराची जबाबदारी आहे, त्यामुळे कमीत कमी शिक्षा देण्यात यावी” त्यावर सरकार तर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की, “मयत आबा कांबळे याच्या शरीरावर 58 वार असून त्याची निर्घृण हत्या केली आहे, त्यामुळे आरोपींना 25 वर्षाची शिक्षा देण्यात यावी व आबा कांबळे याचे पत्नीस नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक आरोपीने दोन लाख देण्याचा आदेश करण्यात यावा” तदनंतर आरोपींचे वकिलांनी सरकार पक्षातर्फे केलेल्या मागणीस विरोध केला व असा युक्तिवाद केला की, “25 वर्षाची शिक्षा द्यावी असे या स्टेजला म्हणता येणार नाही, गुन्ह्यास फक्त शिक्षा फाशी किंवा जन्मठेप अशीच तरतूद आहे, त्यामुळे 25 वर्षे शिक्षेची मागणी करता येणार नाही, आरोपी हे गेल्या साडेपाच वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, सरकार पक्षाचे मागणीप्रमाणे दोन लाख देण्याची आरोपींची ऐपत नाही” दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने मध्यांतर नंतर निकाल दिला जाईल असे सांगितले..
मध्यंतरानंतर मा. न्यायालयाने आरोपीना भा. द. वी. कलम 302 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी 10,000 दंड, दंड न भरल्यास 3 महिन्यांचा कारावास, शस्त्र कायदा अंतर्गत 1 वर्षाची शिक्षा व प्रत्येकी 5,000/- दंड, दंड न भरल्यास 1 महिन्याचा कारावास तसेच भा. द.वि कलम 148 अंतर्गत 1 वर्ष शिक्षा व प्रत्येकी 2000/- दंड, दंड न भरल्यास 1 महिन्याची शिक्षा सुनावली.
यात आरोपींतर्फे ॲड. श्रीकांत जाधव, ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. शिव झुरळे, ॲड. आकाश देठे तर सरकारतर्फे ॲड. प्रदिपसिंग रजपूत यांनी काम पाहिले.