भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या बाजूने ही शिक्षक संघटना सरसावली ! प्रचारासाठी उतरणार मैदानात
सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकही मैदानात उतरणार आहेत. सर्व शिक्षकांनी यात योगदान द्यावे असे आवाहन भाजपा महाराष्ट्र शिक्षक आघाडी संयोजक प्रशम कोल्हे यांनी केले.
भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शुक्रवारी भाजप कार्यालय येथे शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपा पश्चिम महाराष्ट्र शिक्षक आघाडी संयोजक डॉ. नारायण राजुरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाजपा महाराष्ट्र शिक्षक आघाडी संयोजक प्रशम कोल्हे म्हणाले, शिक्षकांनी घरोघरी जाऊन केंद्र शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब नागरिक, मध्यमवर्गीयांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती नागरिकांना द्यावी. भाजप उमेदवार राम सातपुते यांना निवडून आणण्यासाठी भाजप शिक्षक आघाडीने ‘घर चलो अभियान’ राबवावे. विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना करावे, असे आवाहनही संयोजक प्रशम कोल्हे यांनी केले. याप्रसंगी भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शिक्षकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
भाजपा शिक्षक आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना याप्रसंगी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, विशाल गायकवाड, प्रा. नारायण बनसोडे, ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष राम वाकसे, चिटणीस नागेश सरगम, माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड, सोलापूर शहर शिक्षक आघाडीचे संयोजक दत्ता पाटील, सहसंयोजक संजय टोणपे आदी उपस्थित होते.
सहविचार सभेद्वारे सोडविणार शिक्षकांच्या समस्या
शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षण सहसंचालक यांच्या समवेत शिक्षकांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात येईल. यातून शिक्षकांच्या अडचणींचा निपटारा केला जाईल. तसेच शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी भाजपा शहर शिक्षक आघाडीचे संयोजक आठवड्यातून एक दिवस शहर भाजप कार्यालयात उपस्थित राहतील, असेही भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी शिक्षकांना सांगितले. त्यांच्या या पुढाकाराचे शिक्षक वर्गाने प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.