“भाई लोग ताई खासदार बनी” ; “चलो MLA की तय्यारी शूरू करो” ! सोलापुरात एमआयएमला गोल्डन चान्स
सोलापूर : काँग्रेसच्या शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्या आहेत. त्यामुळे शहर मध्य हा मतदारसंघ रिकामा झाला असल्याने आमदारकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेकांच्या नजरा या मतदारसंघावर आहेत. सर्वाधिक मुस्लिम समाज मतदार असलेल्या या मतदारसंघात आता एमआयएम पक्षासाठी हा गोल्डन चान्स मानला जात आहे.
एमआयएमने सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी यंदा उमेदवारी दिली नाही त्याचा निश्चितच फायदा खासदार प्रणिती शिंदे यांना झाला.
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाच्या भावना लक्षात घेता एमआयएम शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी समाजापुढे न जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या निर्णयाचे मुस्लिम समाजातून स्वागत करण्यात आले. पक्षाचा उमेदवार नसल्याने किमान प्रणिती शिंदे यांना 40 ते 50 हजार मताचा फायदा झाला असल्याचे बोलले जाते.
फारूक शाब्दी यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ते दोन नंबर वर राहिले. सुमारे 38 हजार हून अधिक मतदान त्यांना मिळाले. परंतु मागील दोन विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहता एमआयएम पक्षाला विजयासाठी किमान दहा ते बारा हजार मते कमी पडतात. केवळ मुस्लिम समाजाचा जोरावर एमआयएमची शीट निघत नाही. त्यांना इतर सेक्युलर मते मिळवणे आवश्यक आहे. त्यामध्ये आंबेडकरी समाज, मोची समाज, भटका विमुक्त समाज यांच्यामध्ये एमआयएम रुजवणे गरजेचे आहे.
शाब्दी यांना आता मोठी संधी चालून आली आहे. त्यांनी आतापासूनच तयारी सुरू करणे गरजेचे असून मुंबई दौरे कमी करून सोलापुरात ठाण मांडून बसण्याची गरज आहे. मुस्लिम समाज एमआयएम सोबत राहतो. पण विजयी मतदान मात्र मिळत नाही. त्यामुळे या समाजाने आता विचार करून मतदान करण्याची गरज आहे. तसेच शाब्दी यांनी आपल्या सोबत आता मागासवर्गीय, मोची, भटक्या जाती जमाती मधील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरावे लागेल. पुढची मोर्चेबांधणी करावी लागेल. ज्यांना पक्षात प्रतिष्ठान आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना आता शाब्दि यांनी टाळणे पसंत करावे. केवळ पैशाच्या जोरावर ही निवडणूक जिंकता येणार नाही.
कारण आगामी विधानसभा निवडणूकीत मध्य या मतदारसंघातून पुन्हा हिंदुत्ववादाचा मुद्दा पुढे येणार यात शंका नाही. त्याचा विचार करून मुस्लिम, आंबेडकरी, मोची, भटक्या विमुक्त या समाजाची मते सोबत ठेवली तरच शाब्दी यांचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.