खबरदार ! लिपिकाच्या हातूनच फाईल माझ्याकडे आली पाहिजे ; माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा दम
सोलापूर : सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाला पूर्ण वेळ लागलेले शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कार्यालयातील विस्कटलेली घडी ते बसवत असून प्रलंबित कामांचा निपटारा करण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे.

मागील दोन वर्षापासून जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभाग हा संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय झाला. बोगस दिलेल्या मान्यतांमुळे चौकशी लागली. त्यातच दोन वर्षात या विभागाला किमान चार ते पाच शिक्षणाधिकारी लाभले. यामध्ये अनेकांना अतिरिक्त पदभार देण्यात आला. मारुती फडके हे पूर्ण वेळ शिक्षणाधिकारी म्हणून आले होते परंतु ते दबकत दबकत काम करत असल्याने त्यांचा या ठिकाणी इंटरेस्ट दिसून आला नाही. काही महिन्यातच त्यांनी झेडपीतून काढता पाय घेतला.
यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाची घडी पूर्णपणे विस्कटली. अनेक कर्मचारी बदलून गेले, आले. त्यामुळे कामकाजात गोंधळ उडत आहे. यातच मागील दोन महिन्यापूर्वी वर्धा येथून शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे सोलापुरात आले आहेत. एकूणच त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागाच्या कामकाजाची पद्धत पाहिली असता फारच गोंधळ आणि कामांमध्ये अनियमितता दिसून आली. त्यामुळे ते विभागाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यासोबतच शिक्षक संघटनांशी सकारात्मक चर्चा करून कामकाज करताना दिसत आहेत.
यापूर्वी माध्यमिक मध्ये कामकाजाच्या फाईल या थेट संबंधित व्यक्ती हातात देऊन शिक्षणाधिकाऱ्याकडे जाऊन सह्या घेतल्या जायच्या अशी पद्धत प्रचलित झाली होती का असा प्रश्न उपस्थित होतो. मागील काही दिवसापासून या ठिकाणी काम करणारे लिपिक हे ज्याची फाईल आहे त्याच्या हातातच देऊन शिक्षणाधिकाऱ्याकडे पाठवतात. अनेक वेळा असे प्रकार लक्षात आल्यानंतर जगताप यांनी आता थेट कर्मचाऱ्यांना दम भरला आहे. लिपिकाच्या हातातूनच फाईल माझ्याकडे आली पाहिजे अन्यथा खबरदार त्यामुळे कार्यालयातील लिपिक सुद्धा आता साहेबांच्या या शिस्तीच्या स्वभावामुळे अलर्ट झाल्याचे चित्र आहे.