खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. बबनराव शिंदे यांच्या वाहनासमोर फेकली ‘गाजर ‘ ; काय आहे नक्की प्रकार
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना त्यांच्याच मतदारसंघात शेतकरी तसेच मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या समवेत खासदार निंबाळकर हे माढा तालुक्यात असताना त्यांच्या वाहनांच्या समोर चक्क गाजरांचा पाऊस पाडून त्यांचा निषेध करण्यात आला.
या घटनेची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली असून त्यात पोलीस बंदोबस्तात निघालेल्या खासदार निंबाळकर यांच्या मोटारीवर काही तरूण गाजरे टाकताना दिसतात. माढा तालुक्यात रांझणी गावाजवळ हा प्रकार घडला. रांझणी-आलेगाव-गार अकोले-टाकळी-आढेगाव या नवीन रस्त्याच्या भूमिपूजनासाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार बबनराव शिंदे हे आले होते. त्यांच्या सोबत पोलिसांची सुरक्षा व्यवस्थाही होती. परंतु त्यांच्या वाहनांवर गाजर फेकणारा हा भाजपचाच स्थानिक कार्यकर्ता असल्याचे बोलले जात असून त्यांनी तीन ते चार क्विंटल गाजरे फेकली. त्यामुळे रस्त्यावर गाजरांचा अक्षरशः सडा पडला होता.
खासदार निंबाळकर यांची केवळ विकासाचे गाजर दाखविण्याच्या खोट्या वृत्तीचा निषेध नोंदविण्यासाठी त्यांच्या वाहनांवर गाजरांचा पाऊस पाडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात खासदार निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा आंदोलनाचा प्रकार घडलाच नाही. आपला माढा तालुक्यातील दौरा निर्विघ्नपणे पार पडल्याचा दावा केला.