सोलापूर : मुंबईतील खारघर या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण समारंभावेळी उष्माघाताने सुमारे 13 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना इतकी गंभीर आहे की ऑन द रेकॉर्ड तेरा जण दाखवत आहेत मात्र ऑफ द रेकॉर्ड किती जण मृत्युमुखी पडलेत हे मात्र आकडा समोर येऊ शकत नाही. या प्रकरणात या कार्यक्रमाचे संयोजक महाराष्ट्र सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी राजीनामा द्यावा आणि या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.
सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात चौकशीची मागणी करत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला होता. दरम्यान या पत्रकार परिषदेनंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नूतन शिवसेना प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांनी या प्रकरणात प्रथमच काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली आहे आणि या टिकेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सावरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना ज्योती वाघमारे म्हणाल्या, 2010 साली कॉलरामुळे दहा लोकांचा सोलापुरात बळी गेला तेव्हा आमदार प्रणिती शिंदे यांनी राजीनामा का दिला नाही असा प्रश्न उपस्थित करत आपलं ठेवायचं झाकून आणि…. या शब्दात त्यांनी टीका केली आहे.
2010 चा जुना विषय पुढे करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना लक्ष केले जात असून खारघर या दुर्घटनेला झाकण्याचा दुर्दैवी प्रयत्न सोलापुरात भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते करत असल्याचे चित्र आहे.


















