सोलापूर : अनेक दिवसानंतर घरच्या नळाला आलेले पाणी त्यामूळे धडपडत मोटार लावताना विजेचा जोरदार धक्का बसून एका दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहरातील लष्कर भागात घडली.
शांतराज युवराज तिल्लारे राहणार उत्तर सदर बाजार, लष्कर, सोलापूर असे त्या बालकाचे नाव आहे.
मंगळवारी सकाळी साडे नऊ दरम्यान ही घटना घडली. सकाळी नळाला पाणी आले होते, तो पाण्याची मोटार लावत असताना विजेचा धक्का बसला, बेशुद्ध अवस्थेत त्याला नातेवाईकांनी सिविल हॉस्पिटल मध्ये आणले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्या बालकाचा मृतदेह सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असून या ठिकाणी शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे, काँग्रेस नेते प्राध्यापक नरसिंह आसादे, काँग्रेसचे माजी युवकाध्यक्ष अंबादास करगुळे, हणमंतु सायबोळू यांच्यासह अनेक नागरिक ठाण मांडून आहेत.
महापालिकेच्या गलथान कारभारामुळे या बालकाचा जीव गेल्याचा आरोप सर्वांनी केला असून मृत बालकाच्या कुटुंबीयांना जोपर्यंत महानगरपालिकेकडून शासकीय मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह उचलला जाणार नाही अशी भूमिका सर्वांनी घेतली आहे.


















