सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद मधील संघटनेच्या नेत्यांमध्ये असमन्वय दिसून आला. दुपारच्या सुमारास त्यांनी एकमेकांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली मात्र सायंकाळी त्यांच्यात समन्वय होता. हा प्रकार म्हणजे ‘दुपारी गोंधळ, सायंकाळी मुजरा’ असाच दिसून आला.
जिल्हा परिषदेच्या 87 कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंती, आपसी, बदल्या पहिल्या टप्प्यात मंगळवारी करण्यात आल्या आहेत. संघटनेने वर्चस्व दाखविण्यासाठी काही नेत्यांची पळापळ सुरु होती. आपल्या माणसाला चांगला टेबल आणि त्याची सोय व्हावी म्हणून प्रयत्न सुरू होता, प्रशासनाने मुख्यालयातील विभागाच्या जागा रिक्त दाखविल्या नसल्याने संताप व्यक्त करत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची भेट घेतली.
काही नेते परस्पर जाऊन साहेबांच्या पुढे पुढे करत असल्याने एका संघटनेच्या ज्येष्ठ ‘भाऊंनी’ तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी राजेश देशपांडे यांनी आपल्या संघटनेच्या सदस्यांसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकांदे यांच्या कार्यालयात येऊन सत्कार केला. या बदल्यावर प्रतिक्रिया देताना कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बदली प्रक्रिया राबवण्यात आली. सकाळपासून समुपदेशनासाठी कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. प्राथमिक शिक्षण विभागातील 1 विनंती बदली, सामान्य प्रशासन विनंती 24 , प्रशासकीय 7, ग्रामपंचायत विनंती 16, आरोग्य विभाग विनंती 31 आपसी 1, वित्त विभाग प्रशासकीय 3, महीलाबाल कल्याण प्रशासकीय 4 आशा बदल्या पहिल्या टप्प्यात करण्यात आल्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकांदे यांनी माहीती देताना सांगितले की, मुख्यालयात अनेक जागा रिक्त असताना कर्मचारी येण्यास नकार का देत आहेत हा प्रश्न पडला आहे अशी शंका व्यक्त केली.



















