सोलापूर : काँग्रेस पक्षाने घेतलेल्या निर्धार महाशिबिरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष अशोक निम्बर्गी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दुसरीकडे महाशिबिरावर शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांचे वर्चस्व दिसून आल्याने जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी दिसत होती. त्यांना बसायला दिलेली खुर्ची ही एका कोपऱ्यात असल्याने ती नाराजी त्यांनी भर कार्यक्रमातून उठून जाऊन दाखवली.
कार्यक्रमात नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांचे नाव घेत त्यांच्या खुर्चीकडे पाहिले परंतु त्यावेळी जिल्हाध्यक्ष दिसून आले नाहीत याची मात्र माध्यमांमधून ही मोठी चर्चा झाली. या कार्यक्रमानंतर जेव्हा पटोले हे सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी दुपारच्या भोजनासाठी गेले असता त्या ठिकाणी हसापुरे यांनी भेट घेतली.
तेव्हा त्यांच्या खांद्यावर हात टाकत ‘मास्टरमाइंड सुरेशराव’ असा शब्द पटोले यांनी वापरल्याचे सांगण्यात आले. जेव्हा पटोले हे बाहेर पडत होते तेव्हा एका कार्यकर्त्यांनी त्यांना हार घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा तोच हार नाना पटोलेनी सुरेश हसापुरे यांच्या गळ्यात घातला. या महाशिबिरात पक्ष संघटना वाढीकडे गांभीर्याने लक्ष घालण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्षांनी शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. काम केले नाही तर थेट पदे काढून घेइन असा सज्जन त्यांनी भरला. त्यामुळे नाना पटोले यांच्या मनात चाललंय तर काय? असा प्रश्न आता कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.


















