सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमोल कुलकर्णी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हटले आहे की, गेल्या १५ महिन्यापासून सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक आहेत. परंतु ते कुंभकर्णाच्या झोपी गेलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन सोलापूर शहरातील विस्कळीत व दुषित कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे शहरातील नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. त्या अनुषंगाने आम्ही वारंवार महापालिकेच्या प्रशासनास निवेदन दिली त्यानंतर त्यांच्यात काहीच फरक न पडल्यामुळे आंदोलन करुन जागे करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यामध्ये तिळमात्र फरक पडला नाही. याचा विपरीत परिणाम म्हणून गेल्या काही दिवसापूर्वी लहान बालकांचा मृत्यु सुध्दा झाला. तरी प्रशासनाला कसलेच सोयरसुतक उरले नाही.
सोलापूर शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा संपवण्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम थांबलेले आहे. त्याचा शासनस्तरावर पाठपुरावा करुन कायमचा मार्ग काढून सोलापूरकरांची तहाण भागवावी.. सोलापूर शहर हे स्मार्ट सिटीत आले होते सर्व सोलापूरकरांना खुप आनंद झाला होता परंतु तो क्षणीक राहिला कारण स्मार्ट सिटी अंतर्गत झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून संबंधीत महापालिकेचे ठेकेदारावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे ठेकेदार व प्रशासकीय अधिकारी यांच्यात संगनमत असल्याचे जाणवते.
वरील सोलापूरातील नागरिकांचे प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यात यावा अन्यथा मनसेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल.


















