सोलापूर : केंद्रात, राज्यात अन सोलापुरात जनतेने भाजपाला मोठ्या अपेक्षेने सत्ता दिली. पण, भाजपाच्या नेत्यांनी त्या सत्तेचा उपयोग सोलापूरकरांसाठी न करता स्वतः च्या स्वार्थासाठी करुन घेतला. आता सर्व स्तरावर नापास झाल्यानंतर सोलापूरकरांची दिशाभूल करण्याचा खेळ भाजपा नेत्यांनी सुरु केला आहे अशी टिका कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी केली.
ते म्हणाले, सोलापूर महापालिकेत भाजपाची पाच वर्षे सत्ता होती. या सत्तेच्या काळात स्थायी समितीला सभापतीदेखील भाजपाला देता आला नाही. शहरात प्यायला पाणी मिळत नाही. स्मार्ट सिटीची कामे निकृष्ठ दर्जाची झाली आहेत. दुहेरी जलवाहिनीचे कामही सुरु झालेले नाही. शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. शहरात एकही ठोस विकासकाम ते करु शकलेले नाहीत. काही कामांचे सुशोभिकरण करुन विकासकामांचे लोकार्पण करीत असल्याचा गवगवा केला जात आहे.
प्रत्यक्षात विकास कोठे आहे, हे आता भाजपाच्याच नेत्यांनी शोधावे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काही कॉंग्रेसमधील नेते व कार्यकत्यांनी भाजपात प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे. पण, प्रत्यक्षात एकानेही कॉंग्रेस सोडलेली नाही. जे सोडले ते कायमच भाजपासोबत आहेत. आम्ही खूप कामे केली आहेत. इतर पक्षातील लोक आमच्याकडे येत आहेत. असेच भासविण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरु आहे, असेही प्रकाश वाले म्हणाले.



















