सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सोलापूर व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व मानसिक आरोग्य कार्यक्रम तसेच जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 31 मे 2023 जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त दंत आरोग्य तपासणी शिबिर, मानसिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा परिषदेच्या प्रांगणात करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी उपस्थितांना जिल्हा परिषद परिसर, जिल्हा परिषदेच्या सर्व उपक्रमांमध्ये स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. तसेच तंबाखूचे सेवन करून कुठेही थुंकू नये याबाबत उपस्थितांना सूचना केल्या. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय पाटील यांनीही तंबाखू सेवन विरोधात मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमात जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या औचित्य साधून युवकांमध्ये तंबाखूचे दुष्परिणाम याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी 17 5 23 रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच 26 5 2023 रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी या स्पर्धेतील विजेत्यांना संदीप कोहिनकर, डॉक्टर धनंजय पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांच्या हस्ते प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
तसेच उपस्थितांना जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शपथ देण्यात आली. त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय येथील तपासणी वाहनाचे उद्घाटन कोहीनकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोनिका हिरेमठ, सच्चिदानंद बांगर, शशिकांत ढेकळे, स्वाती गायकवाड यांनी परिश्रम घेतले.



















