सोलापूरात मागील काही दिवसात राजकिय भुंका-भुंक पहायला मिळाली.. मागील काही निषेधार्थ आंदोलनात सोलापूरची राजकीय भाषा वेगळ्या वळणावर गेल्याच पहायला मिळालं. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांना सोलापूरात “बरडे साहेब” म्हणून ओळखतात. त्यांची सोलापूरच्या राजकारणात वेगळी छाप आहे. भाजप नेत्यांशी विशेष दोस्ती आहे. तसे त्यांनी किती शिवसेना वाढवली हा संशोधनाचा विषय असला तरी त्यांचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वरील प्रेम कायम दिसून येते.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद आक्रमक शैली असलेल्या श्रीकांत देशमुखांना मिळाले, भाजपवर देशमुखी छाप पडली आहे. श्रीकांत रावांना जिल्ह्याचं अध्यक्ष पद मिळवून देण्यात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मोठा वाटा त्यामुळे दोन देशमुख बापू-मालकांना हे कदाचित आवडले नसेल पण पक्षाने दिलेला शेवटी तो अध्यक्ष.
सध्या ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून भाजपने महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन उभे केले आहे, सोलापूरात एका आंदोलना दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, या आंदोलनाचे सोलापूरात पडसाद उमटले.
शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखांना थेट धमकावले परत असे कृत्य केले तर मंगळवेढा रोडवरील मरीआई चौक ओलांडू देणार नाही अशा भाषेत दम दिला, देशमुखांनी खरे तर तेव्हाच त्याला सडेतोड उत्तर द्यायला हवे होते मात्र त्यांनी नरामाईने भाषा वापरली व ते गप्प बसले.
आपल्या जिल्हाध्यक्षाला एका विरोधी पक्षाच्या नेत्याने धमकावले याचा निषेध व्हायला हवा होता, त्याला कुणी तरी उत्तर द्यायला हवे होते, मात्र एकानेही यावर भाष्य केले नाही, दोन देशमुख नेत्यांनी शब्द काढला नाही की शहराध्यक्ष देशमुख बोलले नाहीत, बापूना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली मात्र ते न बोलता निघून गेले, शेवटी 12 दिवसानंतर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखांसाठी साताऱ्याच्या माणसाला धावून यावे लागले हे विशेष.
खासदार रणजित निंबाळकर यांना घेऊन श्रीकांत देशमुख छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ आले त्यांनी बरडे यांना मी आलोय, भुंकणारे चावत नसतात या शब्दात बरडे यांना चॅलेंज केले त्यावेळीही तिन्ही देशमुख नेते तिथे दिसले नाहीत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कायम वाद होतात, त्यांना अटक झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांनी लगेच निषेध करत प्रतिक्रिया दिल्या, विरोध केला तसे सोलापूरात झाले नाही त्यामुळे व्यक्ती कुणी का असेना पक्षाच्या पदाला महत्व आहे हे सोलापूरात कुणालाही समजले नाही हे भाजपचे दुर्दैव म्हणावे लागेल.

















