सोलापूर : कर्मचारी-अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असताना नियमांत पालन करावं लागते. त्याचवेळी नियम आणि स्थानिक परिस्थिती यांचा मेळ घालून सेवा केली तर कोणत्याही अडचणी येत नाहीत. येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे सात वर्षे सेवा बजावत असताना, चांगल्या प्रकारे काम करता आले, अशी भावना ग्राम विस्तार अधिकारी आय. एम. पठाण यांनी व्यक्त केली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे कासेगांव येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्यावतीने ग्राम विकास अधिकारी आय. एम. पठाण यांच्या बदलीप्रित्यर्थ निरोप समारंभ, नूतन ग्राम विस्तार अधिकारी बाळासाहेब चौगुले यांचे स्वागत आणि नवनियुक्त ग्राम तंटामुक्त समिती अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रहत विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन म्हाळप्पा गुड्ड होते.
कासेगांव येथील माझी नियुक्ती तसे पाहता अपघाताने झाली होती, असे वाटते. येथे काम करीत असताना यापूर्वीच्या ग्रामपंचायत पदाधिकारी आणि विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या सहकार्य तसेच १४ व्या वित्त आयोगाच्या विकास कामांच्या नियोजन आराखड्यात टाकलेल्या विश्वासामुळे गांवासाठी चांगल्या प्रकारे काम करता आलं. नियमांच्या चाकोरीबरोबर समन्वयाचा दृष्टिकोण ठेऊन कर्तव्य बजावत असताना, एखाद्याचे काम झाले नसेल अथवा एखाद्याला दुःख पोहोचले असेल, तरीही मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असेही ग्रामविस्तार अधिकारी पठाण यांनी निरोप समारंभाच्या हृदयस्पर्शी समारंभात बोलताना म्हटले.
माझ्या हातून उरलेली कामे, नूतन ग्राम विस्तार अधिकारी बाळासाहेब चौगुले तितक्याच कर्तव्य भावनेतून पूर्ण करतील, असा विश्वास आय.एम. पठाण यांनी व्यक्त करून या गावातील राजकीय-सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठांच्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य झाले. मी सर्वांचा ऋणी असल्याची भावनाही पठाण यांनी यावेळी व्यक्त केली.
या सत्कार समारंभात आय. एम. पठाण, बाळासाहेब चौगुले आणि चंद्रकांत चव्हाण यांचा अनुक्रमे माजी सरपंच नेताजी पाटील, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक शंकर येणगुरे आणि उपसरपंच शंकर वाडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य निशिकांत पाटील यांनी केले.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष माळी, जनार्दन काळे, प्रविण चौगुले, रवि रोकडे,अस्लम तांबोळी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी अमोल जाधव, दिनेश भोसले, खंडू गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
















