सोलापूर विधान परिषदेची निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 75 टक्के पेक्षा कमी संस्था असल्याचा मुद्दा पुढे करत राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नेते संतोष पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणी भारत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती या तक्रारीतील म्हणणे ऐकून निवडणूक आयोगाने आपल्याकडे दाखल करून घेतली आहे. संतोष पाटील यांच्या तक्रारीबाबत म्हणणे ऐकून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त धर्मेंद्र शर्मा यांची नेमणूक मुख्य निवडणूक आयुक्तांनी केली होती. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणूक होईल अशी आशा निर्माण झाली आहे.
संतोष पाटलांनी या तक्रारीत दाखल केलेले मुद्दे काय आहेत?
राज्यसरकारने जिल्हाधिकार्यांना हाताशी धरून हे षडयंत्र केले आहे राज्य निवडणूक आयोगाला जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेला अहवाल वस्तुस्थितीला धरून नाही.
जिल्ह्यात पाच नगर पंचायत नव्याने गठित झाल्या आहेत मात्र त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. नव्याने होणाऱ्या नगरपंचायत आणि त्याचे नगरसेवक असे मिळून मतदार संख्या गृहित धरण्यात आली असून ते चुकीचे आहे. राज्य निवडणूक आयोगाला जिल्हाधिकाऱ्यांकडून नव्याने अहवाल मागविण्याच्या सूचना कराव्या.
सध्याच्या मतदारांचा कार्यकाळ येणाऱ्या जानेवारीमध्ये संपणार असून त्यांच्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणण्याचा हा प्रकार आहे याच मतदारांना मतदान करण्याचा अधिकार निवडणूक कधी ही होवो तो पर्यंत कायम ठेवावा असा महत्त्वाचा मुद्दा या तक्रारीमध्ये मांडण्यात आला आहे.

















