सोलापूर – पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी पुन्हा एक दणका दिला आहे.सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांकडे सदर बाजार पोलीस ठाण्याचा चार्ज देण्यात आला आहे.तर सलगर वस्ती पोलीस ठाण्यातील इंद्रजित वर्धन यांकडे सलगर वस्ती पोलीस ठाण्याचा चार्ज देण्यात आला आहे.पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.दोनच दिवसापूर्वी सदर बाजार पोलीस ठाण्यात हाणामारी होऊन किरकोळ दगडफेक झाली होती.भिशीच्या कारणावरून दोन गट आमनेसामने येऊन सदर बाजार पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ झाला होता.
तसेच सदर बाजार पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सर्जेराव पाटील यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो सोलापूर युनिटने कारवाई केली होती.यामुळेच पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांची उचलबांगडी झाली की काय अशी चर्चा सुरू आहे.
ऑर्केस्ट्रा बार प्रकरणावरून विजापूरनाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांना आयुक्त हरीश बैजल यांनी निलंबित केले होते.पण नंतर उदयसिंह पाटील यांचे निलंबन रद्द झाले असून त्यांची आता सोलापूर शहर सायबर पोलीस ठाणे येथे नियुक्ती झाली आहे.तर सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांना देखील निलंबित केले आहे.
फौजदार चावडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले दीपक बरडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे तर पीएसआय नागेश म्हात्रे यांची नियंत्रण कक्षातुन सदर बाजार पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.एपीआय संजय क्षीरसागर यांनी सुरक्षा शाखेतून सदर बाजार पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे कामात कचुराई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे व पोलीस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशी परिस्थिती पोलीस दलात निर्माण झाली आहे.पण प्रामाणिक काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना घाबरण्या सारखे काही नाही.पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांवरच अशी कारवाई होत असल्याने पोलीस ठाण्याचे कामकाज सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.ज्या ज्या हद्दीत बेकायदेशीर धंदे चालत आहेत,तेथील संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी यामधून बोध घेणे आवश्यक आहे.अन्यथा पोलीस आयुक्तांच्या कारवाईचा बडगा त्यांवर देखील पडू शकतो.

















