सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्याचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच सोलापूरच्या राजकारणात वेगळं वलंय आहे. त्यांचे भाचे म्हणून ओळख असणाऱ्या माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी कायमच राजकीय टशन राहिल आहे.
एकेकाळी वडाळा गावच्या कॅन्टीन वर बसणारे सुभाष देशमुख नंतर कॉन्ट्रॅक्टर झाले, पुढे भारतीय जनता पार्टी कडून विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार झाले. 2004 साली खासदार झाले, नंतर ते राज्याचे सहकार मंत्री झाले. बँकिंग, शैक्षणिक आणि साखर कारखानदारी क्षेत्रात ही बापूनी मोठी झेप घेतली आहे. दुसरीकडे त्यांचे मामा बळीराम काका साठे हे मागील 35 वर्षापासून जिल्हा परिषदेवर निवडून येतात, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते, सभापती ही सर्व पदे बळीराम काका साठे यांनी भूषवली आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत.
2017 साली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी काका साठे आणि दिलीप माने यांची आघाडी तुटली शेवटी नाईलाजाने काका साठे यांना उत्तर तालुक्यातील भाजपशी जुळवून घ्यावे लागले, आणि काका व बापू यांचे मनोमिलन झाले. त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला झाला आणि पहिल्यांदा भाजपचा सभापती पंचायत समितीवर विराजमान झाला. नंतर काही दिवसांनी पुन्हा सुभाष बापू व काका साठे यांचे बिनसले. बाजार समितीची निवडणूक लागली दिलीप माने काका साठे पुन्हा एकत्र आले या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन त्यावेळचे सहकार मंत्री असलेल्या सुभाष देशमुख यांना धूळ चारली.
2019 च्या निवडणुकीवेळी दिलीप माने शिवसेनेत गेले त्यांनी व त्यांचे पारंपरिक विरोधक सुभाष देशमुख या दोघांनी एकाच व्यासपीठावर एकमेकांचा प्रचार केला. बापू जिंकले, माने हरले.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांमध्ये माने गटाचे प्राबल्य आहे. सुभाष देशमुख आणि दिलीप माने गटामध्ये कायम शीतयुद्ध पाहायला मिळते. बापू मानेंवर तोंडसुख घ्यायला विसरत नाहीत. तिऱ्हे गावातील एका रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन वेळी सुभाष देशमुख यांनी दिलीप माने यांच्यावर तिखट अशी टीका करताना यांच्या रक्तातच सुडाचे राजकारण आहे, घरे फोडणे बंद करा असे नाव न घेता आरोप केला होता.
हाच धागा पकडून शुक्रवारी जिल्हा परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष काका साठे यांना पत्रकारांनी याप्रकरणी विचारले असता त्यांच्या त्यांच्यातच चाललय आपल्याला काय? करायचे असे सांगून दिलीप माने यांची बाजू घेतली नाही. तेव्हा बापू तुमच्यावर टीका का करत नाहीत असा प्रश्न केला करत सुभाष देशमुख यांच्याशी पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकीत सुरू जुळतील का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते आता शक्य नाही असे उत्तर काका साठे यांनी दिले मात्र सुभाषशी आपला दुरावा नसल्याचं स्पष्टीकरण काका द्यायला विसरले नाहीत.
याच वेळी पत्रकारांनी यंदाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत दिलीप माने काका साठे आणि इंद्रजीत पवार या तिघांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या,आणि बघू कुणाच्यात किती दम आहे, कोण भारी ठरेल असा प्रश्न केला असता काही वेळ थांबून काका साठे यांनी आम्हीच भारी असणार असे सावध उत्तर दिले.