सोलापूर : केंद्र सरकारच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 सुरू आहे. यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणच्या ॲप मध्ये आपला अभिप्राय नोंदवायचा आहे. या उपक्रमात 18 डिसेंबर पूर्वी सोलापूर जिल्हा हा संपूर्ण भारत देशात दुसऱ्या क्रमांकावर होता. निश्चित आपला जिल्हा हा पहिल्या तीन क्रमांकामध्ये देशात येईल अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केली होती मात्र, 18 आणि 19 डिसेंबर रोजी देशांमध्ये सोलापूर जिल्हा पाचव्या सहाव्या क्रमांकावर गेला. देशातील इतर जिल्ह्यानी या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात अभिप्राय नोंदवला मात्र आपण मागे का? पडले यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.
सोलापूर जिल्हा परिषदेचे सुमारे 11 हजार शिक्षक आहेत, एक हजार ग्रामसेवक आणि हजारो इतर कर्मचारी काम करतात प्रत्येकाने जर 1000 अभिप्राय नोंदवले असते तर सोलापूर जिल्हा भारतात एक नंबर वर गेला असता मात्र त्याचे कुणाला काही देणेघेणे नाही. मला स्वताला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळवायचा नाही मात्र सोलापूर जिल्ह्याचे नाव भारत देशामध्ये होईल यासाठी हा प्रयत्न आहे.
वेगवेगळ्या वाहिन्यांवर महत्व नसलेल्या कार्यक्रमांना मात्र वोटिंग केले जाते त्याचे दिवसाला लाखो वोटिंग होतात मात्र आपल्याकडे का नाही असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. किमान सोमवारी शेवटचा दिवस आहे आज तरी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 मध्ये अभिप्राय नोंदवा अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केल्या

















