सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या दशसूत्री कार्यक्रमांतर्गत अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, आणि उत्तर सोलापूर या तीन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
ही कार्यशाळा हुतात्मा स्मृती मंदिरात संपन्न झाली. तब्बल दोन तास समोर उपस्थित मुख्याध्यापकांना सीईओ स्वामी यांनी मार्गदर्शन केले. या दोन तासाच्या मार्गदर्शनात स्वामी यांची विद्यार्थ्यांप्रती किती तळमळ आहे हे दिसून आले.
यावेळी मुख्याध्यापकांना भावनिक साद त्यांनी घातली. मागील दीड वर्षाच्या अनुभव आणि अथक परिश्रमानंतर मी ही दशसूत्री तयार केली आहे. हे मी कशासाठी करतोय माझ्या प्रमोशनसाठी नाही किंवा मला कुठला पुरस्कार घ्यायचा नाही. मी ज्या जिल्ह्यात काम करतो त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे, ग्रामीण भागातील मुलं शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत यासाठी सर्वात मोठी जबाबदारी ही मुख्याध्यापकांची आहे.असे सांगत त्यांनी दशसूत्री मागील उद्देश स्पष्ट केला…
काय आहे दशसूत्री उपक्रम….
गुणवत्तापुर्ण शिक्षण प्रदान करणे, स्पर्धात्मक व कौशल्याधारक, विध्यार्थी तयार करणे, आनंददायी, नाविन्यपुर्ण व रचनात्मक शिक्षण देणे, आरोग्यपुर्ण व मूल्यसंस्कारक्षम विध्यार्थी तयार करणे, तंत्रस्नेहीव आयटी क्षम विध्यार्थी तयार करणे, मुलांतील सुप्त गुणांस वाव देणे, लेखन, कवी निर्मिर्तीच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्यास प्रोत्साहित करणे, ज्ञानातील आधुनिकता, नवीन पध्दती ग्रहण करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे, मुलांत स्वावलंबनाची वृत्ती वाढवून, त्यांना देशभक्ती, मातृ-पितृ भक्ती शिकवणे, गुरुकुल पध्दतीला उजाळा देत शंभर टक्के शिक्षक व विध्यार्थी उपस्थिती वाढविणे.


















