सोलापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा जनजागृती उपक्रमाची सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, शिक्षण अधिकारी भास्करराव बाबर, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता कोळी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे, महिला व बालकल्याण कार्यक्रमाधिकारी जावेद शेख, कृषी अधिकारी कुंभार यांच्यासह सर्व बीडिओ, विस्तार अधिकारी उपस्थित होते.
उपस्थित अधिकाऱ्यांना बोलताना सीईओ स्वामी म्हणाले, हर घर तिरंगा हा सोलापूर जिल्हा परिषदेसाठी ‘प्रेस्टीज’चा विषय आहे. त्यामुळे सर्वच अधिकाऱ्यांनी इतर विषयांमध्ये लक्ष न देता सोलापूर जिल्हा परिषदेची सर्व यंत्रणा ‘हर घर तिरंगा’साठी कामाला लावावी. प्रत्येक घरी झेडपीचा माणूस गेला पाहिजे. 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात स्वराज्य अभियान आपण राबविणार आहे. या अभियानांतर्गत समूह राष्ट्रगाण घेण्यात येणार आहे, माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक यांचे मेळावे, प्रभात फेरी तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेणार असल्याचे स्वामी म्हणाले.



















