सोलापूर : सुमारे 39 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला मुहूर्त लागला. मंगळवार नऊ ऑगस्ट रोजी 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाकडून सोलापूरचे सुपुत्र तथा परांडयाचे आमदार प्राध्यापक तानाजी सावंत सरांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पहिल्या टप्प्यातील शपथविधीला सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला बोलावण्यात आले नाही. त्यामुळे सोलापूरकरांची घोर निराशा झाली आहे.
2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जनतेने भाजप-शिवसेनेच्या युतीला स्पष्ट कौल दिला होता मात्र शिवसेनेने मुख्यमंत्री पदाची मागणी केल्याने युतीची सत्ता आली नाही. शेवटी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले.
त्या मंत्रिमंडळात प्राध्यापक तानाजी सावंत यांना संधी मिळाली नाही. तेव्हापासून सावंत हे आपल्याच पक्ष नेतृत्वाच्या विरोधात असल्याचे अनेक कार्यक्रमांमधून दिसून आले. ते उघड उघड शिवसेनेवर टीका करायचे आणि नकळत भाजपचे कौतुक करत असल्याचे दिसून येत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार फोडण्यामध्ये तानाजी सावंत यांचा पुढाकार असल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली.
आषाढी वारी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपुरात होते. दहा तारखेच्या आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी तब्बल चार कार्यक्रमांना उपस्थिती लावली. त्या प्रत्येक कार्यक्रमांना तानाजी सावंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भावाप्रमाणे सोबत असल्याचे दिसून आलं. पंढरपुरातील सावंत यांच्या निवासस्थानी ही मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या बिझी दौऱ्यातून सुद्धा भेट दिली होती. यावरून तानाजी सावंत यांचे वजन मुख्यमंत्र्यांकडे किती आहे याचा प्रत्यय त्यावेळी अनेकांना आला.
नक्कीच सावंतांना पांडुरंग पावला अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 2019 च्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या सावंत सरांना नऊ ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या मंत्रीपदाच्या शपथविधीत थेट कॅबिनेट मंत्री पदाची लॉटरी लागली आहे. सोलापुरात आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार शहाजी बापू पाटील यांची नाव मंत्री पदासाठी चर्चेत होती मात्र यापैकी एकालाही संधी मिळालेली नाही. यामध्ये तानाजी सावंत यांनी बाजी मारली आहे निश्चितच त्यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद येईल अशी चर्चा आतापासून सुरू झाली आहे.























