सोलापूर : देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. हर घर तिरंगा या उपक्रमाची सोलापुरात जिल्हा परिषद प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. शनिवारी जिल्हा परिषदेच्या महिला अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांची भव्य अशी हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली.
सीईओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत सर्वात दर्शनी भागात वन विभागाचे वाहन होते, त्यानंतर हरीभाई प्रशालेच्या एनसीसीच्या मुलींचा सहभाग होता, त्यामागे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, गटविकास अधिकारी जसमीन शेख त्यांच्या मागे जिल्हा परिषद महिला अधिकारी व कर्मचारी त्यामागे महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविका होत्या. सुमारे तीनशे महिला कर्मचारी हातात शंभर फूट तिरंगा झेंड्या हातावर घेऊन सहभागी झाल्या होत्या. हे या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले.
शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, महिला बालकल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, शिक्षणाधिकारी किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, कार्यकारी अभियंता सुनील कटक दौंड कार्यकारी अभियंता पंडित भोसले कार्यकारी अभियंता कुलकर्णी, पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी डॉ विजय खोमणे, किरण जाधव, महिला बाल विकास उपायुक्त संजय माने यांचा सहभाग होता.
हुतात्मा स्मृती मंदिर पासून निघालेली रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, डफरीन चौक, हरीभाई देवकरण प्रशाला समोरून जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात विसर्जित झाली. या ठिकाणी ही रॅली आल्यावर मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी महिलांची रॅली असल्याबद्दल ध्वजारोहणाचा मान डेप्युटी सीईओ चंचल पाटील यांना दिला. यावेळी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.
ध्वजारोहणाचा मान मिळाल्याबद्दल चंचल पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार व्यक्त करत सर्व कर्मचाऱ्यांनी घरोघर तिरंगा झेंडा लावा असे आवाहन केले…




















