सोलापूर : आहेरवाडी येथील मल्लिकार्जुन दिंडोरे यांचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने दोषी धरून चौघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती पांढरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दंड म्हणून मयताच्या चार कुटुंबियांना 8 लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी या गावात 19 मार्च 2017 रोजी दुपारी दोनच्या सुमारास मयत मल्लिकार्जुन दिंडोरे व त्याचा भाऊ मधुकर दिंडोरे हे आपल्या दिंडोरे वस्तीजवळ गप्पा मारत बसले होते. त्याच वेळेस बप्पू शिवानंद दिंडोरे, बसवराज महादेव दिंडोरे, सिद्धाराम महादेव दिंडोरे, शिवानंद महादेव दिंडोरे हे त्या ठिकाणी आले.
मयताची बहीण भगीरथी यांच्याशी सर्व आरोपींचे शेतीच्या वाटणीवरून वाद सुरू होते. सदरचा वाद हा मयत मल्लिकार्जुन दिंडोरे यांनी मिटवला होता मात्र भगीरथी यांच्या वाटणीला येणारी जमीन या चौघांचा लाटण्याचा उद्देश होता परंतु हा वाद परस्पर का मिटवला म्हणून या चौघांनी मयताशी व त्यांचा भाऊ मधुकर दिंडोरे यांच्याशी वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
याचवेळी बप्पू दिंडोरे याने त्याच्याजवळ असलेल्या बंदुकीतून गोळीबार केला. बंदुकीची गोळी ही मयत मल्लिकार्जुन दिंडोरे यांच्या डोक्यात घुसली ते गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने सोलापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास अधिकारी म्हणून इंद्रजीत श्रीवर्धने यांनी काम पाहिले.
या प्रकरणात 14 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र त्यापैकी सात साक्षीदार फुटले. याप्रकरणात बॅलेस्टिक रिपोर्ट महत्त्वाचा ठरला. ज्या बंदुकीतून आरोपी बप्पू दिंडोरे याने गोळी झाडली होती ती बंदूक त्याच्या मालकीची आहे व त्या चाललेल्या गोळ्यावरून सिद्ध झाले. शवविच्छेदन अहवाल ही महत्वपूर्ण ठरला.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि जिल्हा सरकारी वकील एडवोकेट प्रदीपसिंह राजपूत यांनी केलेला आयुक्त वाद ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती पांढरे यांनी यांच्या चौघांनाही मृत्यू प्रकरणात दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मयताची पत्नी आणि तीन मुलांना प्रत्येकी दोन लाख प्रमाणे आठ लाखाचा दंड ही ठोठावण्यात आला आहे.