सोलापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात शहरातील सर्वच मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या शांतता कमिटीच्या बैठकीत डॉल्बीचा कुठेही दणदणाट दिसला नाही. सर्वच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी केली
गणेशोत्सव पार्श्वभूमीवर सोलापूर पोलीस आयुक्तालय येथे शांतता कमिटीची बैठक झाली. बैठकीला पोलीस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, पोलीस उपायुक्त दिपाली धाटे, वैशाली कडुकर, बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त अजित परमार, प्रीती टिपरे, प्रांजली सोनवणे, माधव रेड्डी, दीपक आर्वे, संतोष गायकवाड, महावितरण कार्यकारी अभियंता आशिष मेहता, नगर अभियंता संदीप कारंजे, सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, दास शेळके, राजन जाधव, विजय पुकाळे, पांडुरंग दिड्डी, हेमा चिंचोळकर, लता फुटाणे,संध्या काळे, मतीन बागवान, शाम धुरी, भारत परळकर, महेश देवकर, प्रताप चव्हाण, नरसिंग मेंगजी, सुरेश फलमारी, जनार्दन कारमपुरी, विजय शाबादे, देवेंद्र भंडारे, श्रीकांत घाडगे, सुमन मुदलियार यांच्यासह विविध मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमोल शिंदे म्हणाले, आता सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना याची किती दिवसात अंमलबजावणी करणार हे सांगा असा महापालिका आयुक्तांना प्रश्न केला. विसर्जन मिरवणुकीच्या दोन दिवस अगोदर सर्व दुरुस्त्या झाल्या पाहिजेत. निवडणुकीचा काळ आहे, मोठ्या डिजिटल वर बंदी आणा, पोलीस प्रशासन व मध्यवर्ती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय असावा, कचरा उचलायची यंत्रणा सक्षम करा, पोलीस स्टेशनच्या सर्वच हद्दीत एकच नियम ठेवा, फटाक्यांची नियमावली स्पष्ट करा.
दिलीप कोल्हे म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोकांना सर्व विसर्जन केंद्रावरून हाकलून लावावे, शासनाच्या सर्व सूचना पुस्तिका सर्व मंडळांना द्यावात, मंडळांना तीन बक्षीस देतो ती प्रथा पुन्हा सुरू करावी.
पुकाळे म्हणाले, विसर्जन कुंड, विहिरी यांची पाहणी करून संरक्षण द्यावे, सर्व खड्डे बुजवून घ्यावे, सांडपाणी व्यवस्थापन लक्ष द्यावे अशा मागण्या केल्या.
देवेंद्र भंडारे व परळकर म्हणाले, मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या तोडाव्यात, शेवटच्या दोन दिवशी देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी रात्री 10 ची मर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी केली.
मदन पोलके यांनी, संभाजी तलावात येणारे गटाराचे पाणी थांबवावे, रस्त्यावरील मोकाट जनावरे फिरू देऊ नये अशी मागणी केली..
मेंगजी यांनी, सर्व मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवावेत, मिरवणुकीला आड येणाऱ्या झाडाच्या फांद्या तसेज विजेचे वायर काढावेत, शेवटचे पाच दिवस आरास पाहण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर परवानगी द्यावी अशी मागणी केली.
चिंचोळकर म्हणाल्या, विसर्जन वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य दंडेलशाही करून गणपती मूर्ती हिसकावून घेतात, त्या कशाही फेकतात म्हणून आमच्या भावना दुखवतात त्यांच्यावर आवर घालावा अशी मागणी केली.
ओम गर्जना चौक गणपती उत्सव मंडळाच्या वतीने, सैफुल ते कंबर तलाव दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे झाले आहेत ते त्वरित बुजवावी, याच मार्गावर चार ठिकाणी मंडळाचे स्वागत होते, तिथे वेळ जातो, मागच्या वाहनांना त्रास होतो त्यामुळे एकाच ठिकाणी स्वागत व्हावे असे नियोजन करावे अशी मागणी केली.
कारमपुरी म्हणाले, गणेशोत्सव मंडळाला परवानगी देताना त्या त्या मध्यवर्ती मंडळाच्या संबंधित परवानगी द्यावी म्हणजे सोयीस्कर होईल.
राजन जाधव म्हणाले, स्मार्ट सिटीच्या विजेच्या वायरी अस्थाव्यस्त पडल्या असून त्या व्यवस्थित कराव्या, मोकाट जनावरांचा कायम स्वरूपी बंदोबस्त करावा.
प्रताप चव्हाण म्हणाले, लक्ष्मी मार्केट परिसरातून येणारे ड्रेनेजचे पाणी सिद्धेश्वर तलाव येते ते वळवून द्यावे अशी मागणी केली.
मुदलीयर म्हणाल्या, दोन वर्षांनंतर होणारा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मुलांना लेझीम टिपऱ्या खेळण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, पोलिसांनी गडबड करू नये.
ऍड प्रकाश अभंगे म्हणाले, प्रत्येक मोठया मंडळांनी आपल्या मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, वाहतूक मार्गात बदल किमान आठ दिवस अधि जाहीर करावे, जेणेकरून प्रवाशांना पर्यायी मार्गावरून जाता येईल.
श्रीकांत घाडगे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक रस्त्यावरील ड्रेनेज व खड्ड्यांची दुरुस्ती करणे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव चांगल्या प्रकारे साजरा झाल्याने पोलीस प्रशासनाचे मातंग समाजाने आभार मानले. सात रस्ता परिसरात महिलांना मिरवणूक पाहण्यासाठी योग्य सोया करावी.
युवराज पवार म्हणाले, विसर्जन मिरवणुक वेळी एसटी बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. त्यावर लक्ष केंद्रित करावे.
दास शेळके म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सव मध्यवर्ती समितीच्या मिरवणूक मार्गावर कोणत्याही संस्था संघटनेचे स्वागत नको, बेकायदेशीर व्यवसाय करणारांना कंट्रोलमध्ये ठेवा.
पूर्व भागातील देसाई नगर, नीलम नगर भागातील विसर्जन करण्यात येणाऱ्या विहिरी स्वच्छ कराव्यात, आजूबाजूचे काटेरी झाडे तोडावीत.



















