सोलापूर : प्राध्यापिका अंजना गायकवाड यांच्या ‘सांग लाडके तुझी जात कोणती’! काव्यसंग्रहाचे शनिवारी निर्मलकुमार फडकुले सभागृहात मोठ्या थाटात प्रकाशन करण्यात आले. प्राचार्य डॉ मीना गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ नभा काकडे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी माजी आमदार आडम मास्तर, डॉ नसीम पठाण, ज्येष्ठ साहित्यिक दत्ता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आडम म्हणाले, या काव्यसंग्रहाचे हेडिंग जबरदस्त आहे, कदाचित अंजनाताई तुरुंगात जातील. कारण आज देशात जो अन्याय अत्याचार चालला आहे, त्यावर प्रकाश टाकण्याचे काम या संग्रहातून झाले आहे. दलितांचे प्रेम काय असते याची जाणीव मला आहे. आजच्या देशातील परिस्थितीवर भाष्य करताना आडम म्हणाले, या देशात संविधान जोपर्यंत असेल तोपर्यंत आपण जिवंत असू, या देशाची वाटचाल हुकूमशाही, फॅटिस्टकडे चालू आहे. हिटलरही असाच म्हणायचा पण त्याचा शेवट वाईट झाला असे म्हणून आडम यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वर निशाणा साधला.
नसीम पठाण म्हणाल्या, यात केवळ 14 कविता आहेत, पुस्तकात फापटपसारा काही दिसत नाही, अत्यंत बोलकं, शेलकं आणि मोजकं यात असल्याने डोळ्यात अंजन घालणारा हा कविता संग्रह आहे. वैचारिक मंथन आहे, आयुष्याचा सार म्हणावा लागेल या शब्दात त्यांनी या कवितासंग्रहाचे कौतुक केले.
प्रारंभी भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविकात लेखिका अंजना गायकवाड यांनी कवितासंग्रह लिहिण्यामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमास अशोक गायकवाड, भीमराव गायकवाड, सुधीर चंदनशिवे, सर्वोत्तम रणशूर, धम्मपाल माशाळकर, संतोष सोनवणे सह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















