सोलापूर : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल या योजनेतून सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून 36 कोटींची टेंडर प्रक्रिया झाली आहे. या टेंडर प्रक्रियेवर सध्या गोंधळ उठलाय. याच पार्श्वभूमीवर जलजीवन मिशनचा आढावा शुक्रवारी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी घेतला.
या बैठकीला काही आमदार उपस्थित होते. या आढाव्यानंतर मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात सुमारे 900 गावांमध्ये या योजनेची कामे होणार असून 1 हजार कोटींचा निधीचा सोलापूर जिल्हा परिषदेला आला आहे. या टेंडर प्रक्रियेत जिओ टॅगिंग हे महत्वाचे आहे मात्र मोहोळ तालुक्यातील वरकुटे आणि आढेगाव या गावांमध्ये जिओ टॅग न करता टेंडर दिले आहेत.
या प्रक्रियेत टेंडर परस्पर रद्द केले जातात त्यामुळे निश्चितच या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होते. जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत त्यामुळे यात केवळ अधिकारी आणि मक्तेदारांना पोसण्याचे काम होत असल्याने म्हणून संबंधित ग्रामीण पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास सक्तीच्या रजेवर पाठवून सर्व टेंडर रद्द करा आणि यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा अशी मागणी आमदार माने यांनी केली.




















