सोलापूर : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या टेंडरची चौकशी चार अधिकाऱ्यांच्या समितीकडून होत आहे. त्या चौकशी समितीने निपक्षपातीपणे चौकशी न केल्यास त्यांच्यावरच कारवाई करण्यास भाग पाडू असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी दिला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटण्यासाठी ते जिल्हा परिषद कार्यालयात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जलजीवन मिशनच्या टेंडर प्रक्रियेत गोंधळ झाल्याची तक्रार आमदार सुभाष देशमुख, आमदार यशवंत माने, आमदार राम सातपुते यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली होती यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांना रजेवर पाठवले आणि या प्रकरणाची चौकशी जलसंपदा, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम आणि लेखा अधिकारी या चौघांच्या समितीमार्फत पंधरा दिवसात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कार्यकारी अभियंता कोळी यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर सोमवारी आमदार यशवंत माने हे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांना भेटण्यासाठी ते आले असता त्यांची भेट झाली नाही. शेवटी पत्रकारांशी बोलताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या टेंडरची चौकशी चालू आहे, आम्ही पंधरा दिवस थांबणार आहोत या प्रकरणाची सखोल आणि निपक्षपातीपणे चौकशी न झाल्यास अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्यास भाग पाडू असा इशारा त्यांनी दिला आहे.



















