दक्षिण सोलापूर : मुस्ती येथील हरणा नदीस आलेल्या पाण्यात एक शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली आहे. शनिवारी दिवसभर शोध घेतला पण त्यांचा तपास लागला नाही. गेल्या जुलै मध्ये एका युवकाचा येथेच नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे.
शिवानंद शरणप्पा वाले (वय ५६) रा मुस्ती असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शिवानंद वाले हे काल रात्री आपल्या शेतावरून घरी येत होते. काल शुक्रवारी रात्री आठ वाजता वाजता हरणा नदी पात्रातून येताना पाण्याचा प्रवास जास्त असल्याने ते वाहून गेले. याची माहिती मिळाल्यानंतर आज शनिवारी सकाळपासून दिवसभर ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. नदीपात्रात जास्त पाणी असल्याने ते मिळून आले नाहीत.
यापूर्वी गेल्या १७ जुलै रोजी शौकत रशीद नदाफ (वय ३८) रा. आनंदनगर (बेघरवस्ती) मुस्ती याचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. शौकत हा मुस्ती गावातील एका हॉटेलमध्ये काम करून आपले घर चालवत होता. नेहमीप्रमाणे हॉटेलमधील काम संपवून रात्री तो बेघर वस्तीवरील आपल्या घरी निघाला होता. हरणा नदीतून जाताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने तो वाहून गेला होता. त्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला. त्यानंतर अशा दुर्घटना घडू नये म्हणून मुस्ती ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. अनेक वर्षापासून हरणा नदीवर पूल बांधण्याची मागणी करुनसुध्दा प्रशासनाने गांभीर्याने घेतले नव्हते. या युवकाच्या मृत्यूनंतर प्रशासन हलले. त्यानंतर मुस्ती-आरळी दरम्यान पूल बांधण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाने वरिष्ठाकडे पाठविला आहे.
मुस्ती गावाजवळून हरणा नदी वाहते. नदीच्या पलीकडे आनंदनगर (बेघरवस्ती) हा दोन हजार लोकोस्तीचा भाग आहे. नदीला पाणी आल्यानंतर पलीकडे जाताना ग्रामस्थांना संकटाला तोंड द्यावे लागते. दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात सखाराम गायकवाड हे वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक जण पाण्यात वाहून गेले मात्र सुदैवाने ते वाचले. तीन-चार महिन्यातील ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे बेघर वस्तीला जोडणाऱ्या या रस्त्यावरील नदीवर पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पूल बांधण्याचा प्रश्न सरकारी दप्तरी अद्यापही रखडलेलाच आहे. येथे लवकरात लवकर पूल बांधण्याची मागणी मुस्तीचे सरपंच नागराज पाटील यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी केली आहे.


















