सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे ग्रहण अखेरचे सुटले अशा काही बातम्या माध्यमांमधून आल्या. त्याला कारणही तसेच होते, सुमारे वर्षानंतर समाज कल्याण विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळाला आहे. उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्याकडे समाज कल्याण विभागाचा अतिरिक्त पदभार होता.
मात्र आता लातूरचे समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांची जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी खमितकर यांनी पदभार घेतल्याची माहिती आहे.
दरम्यान जिल्हा परिषद समाज कल्याणचे ग्रहण पुन्हा सुरु झाले असल्याचं बोललं जातयं. कारण खमितकर हे वादग्रस्त अधिकारी आहेत. यापूर्वी ते सोलापूर जिल्हा परिषदेला होते, त्यांचा इतर जिल्ह्यातील कार्यकाळ तसा वादग्रस्त राहिला आहे. त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत ते दोन ते तीन वेळा निलंबीत झाले असून त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची तीन वेळा कारवाई झाल्याची माहिती जिल्ह्याच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने दिली आहे.
एकीकडे मागील वर्षभरात जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग अनेक कारणांनी गाजला आहे. दलित वस्ती सुधार योजनेचा टेबल सांभाळणारे स्वामी यांच्यावर अँटीकरप्शन विभागाची कारवाई झाली, दलित वस्ती योजनेत टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोप खुद्द आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केला होता. त्यानंतर एका अधिकाऱ्याचा टेबल काढून घ्यावा लागला. अतिरिक्त पदभार असलेल्या पाटील यांच्या कामावरही नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे समाज कल्याण विभाग बऱ्याच कारणांनी गाजला. आता पुन्हा असा वादग्रस्त अधिकारी आल्यानं हा विभाग चर्चेत राहणार आहे. त्यामुळे समाज कल्याण विभागाचे ग्रहण सुटले नाही तर पुन्हा सुरु झाले अशी चर्चा होऊ लागली आहे.



















