सातारा : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन सातारा जिल्ह्यातील पुस्तकाचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिलार या गावी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी स्वागतपर प्रास्ताविक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात डिजिटल मीडियासाठी आदर्श कायदा व आदर्श नियम करा, प्रथम आम्हाला मान, प्रतिष्ठा द्या, चुकत असेल तर कान धरणारे नियम करा, इतर राज्याने तो आदर्श घ्यायला पाहिजे, जागतिक पातळीवर प्रोफेशनल अप्रोच व्हायला पाहिजे, डिजिटल मीडियाची राजधानी मुंबई व्हावी त्यासाठी धोरण तयार करा, टेम्बू येथे गोपाळ गणेश आगरकर यांचे स्मारक व्हावे, माध्यम अधिस्वीकृती समितीवर सदस्य घ्यावे, अशा महत्वपूर्ण मागण्या त्यांनी केल्या.
“चुकलं तर कान धरा” ही प्रांजल कबुली..
पालकमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, जिल्हा स्तरावर कलेक्टर, एसपी, जिल्हा माहिती अधिकारी यांना अधिकार देऊन अधिकृत कार्ड देऊ त्यासाठी अटी व नियमावली तुम्हीच घालून द्या, नवा पॅटर्न तयार होईल सातारा जिल्ह्यात लगेच करू अशी घोषणा करून टाकली. राजा माने यांच्या चुकलं तर कान धरा या वाक्यावर बोलताना ते म्हणाले माने यांनी प्रांजळ कबुली दिली मात्र पत्रकारांनी एक बाजू न छापता नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घेऊन छापाव्या असे आवाहन केले.
“कोई माने या ना माने वो राजा माने”लय भारी
ज्येष्ठ खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या भाषणात प्रथम मान द्या नंतर कान धरा या वाक्याचा पुन्हा उच्चार केला. ते म्हणाले शंभूराज देसाईजी, राजा माने म्हणाले, आमचा कान धरा, पण त्या अगोदर ते म्हणाले, प्रथम आम्हाला योग्य मान द्या, मग कान धरा लय भारी हे. “कोई माने या ना माने वो राजा माने”.


















