सोलापूर : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत जीवाची पर्वा न करता कोविड सेंटरमध्ये काम केलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना अद्यापही मानधन दिले गेले नाही. दीड वर्ष झाली मानधन प्रलंबित आहे. याविषयी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रत्येक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित करून त्या कर्मचाऱ्यांना मानधन देण्याची मागणी केली होती. त्यावर कोणतीही ठोस निर्णय झाला नाही.
दरम्यान शुक्रवारी झालेल्या डीपीसीत आमदार कल्याणशेट्टी यांनी हा विषय पुन्हा एकदा उपस्थित केला, पालकमंत्री साहेब यावर निर्णय का होत नाही? त्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मानधन दिलं का जात नाही? असे प्रश्न उपस्थित केले, जिल्हा नियोजन समिती मधून देता येईल का? झेडपीचा विषय आहे असा मुद्दा त्यांनी मांडला.
यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पष्टीकरण देताना पालकमंत्री विखे पाटील यांनी लगेच प्रस्ताव तयार करा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशी याविषयी बोलून राष्ट्रीय आरोग्य मिशन मधून तातडीने त्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे आश्वासन दिले.


















