सोलापूर : जुनैदी नर्सिंग होमच्या वतीने पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, डॉ जुनैदी याचे कुटुंबीय, हॉस्पिटल मधील डॉक्टर स्टाफ उपस्थित होता.
इतर वेळी पत्रकार हे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची फिरकी घेतात परंतु या कार्यक्रमात आमदार सचिन कल्याणशेट्टी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकारांची चांगलीच फिरकी घेतली.
आपल्या भाषणामध्ये आमदार कल्याणशेट्टी यांनी बदललेली पत्रकारिता याबाबत बोलताना पूर्वी दैनिके असायची आता मात्र विविध वाहिन्या, यूट्यूब चैनल, न्यूज पोर्टल झाल्याने पत्रकारिता गतिमान झाल्याचे सांगत हे पत्रकार रात्री एक एक वाजेपर्यंत झोपत नाहीत असे म्हणताच एसपी सरदेशपांडे म्हणाले, स्वतःही झोपत नाहीत आणि आपणाला ही झोपू देत नाहीत असे वाक्य बोलताच उपस्थित पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी धकाधकीच्या जीवनामध्ये पत्रकारांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही असे सांगतानाच या आरोग्य तपासणी शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करत पत्रकारांची संपूर्ण आरोग्य तपासणी करा अजिबात त्यांना सोडू नका असे म्हणून उपस्थितांमध्ये हशा पिकवला. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी जेष्ठ पत्रकार एजाज हुसेन मुजावर यांनी परिश्रम घेतले.