वय झाले, तब्बेत साथ देत नाही. त्यामुळे मी कंटाळलो आहे. आता पुस्तक जमा केले की जिल्हाध्यक्ष पदातून मी मोकळा होईन आणि राजकारणातूनही निवृत्ती घेण्याचा माझा विचार आहे, असे काका साठे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील व प्रवक्ते उमेश पाटील यांच्यातील राजकीय वैर विकोपाला गेले आहे. साखर कारखान्याची निवडणूक व त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात दोघांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले आहेत. या वादात आमदार यशवंत माने यांनी उडी घेतली आहे. उमेश पाटील यांचा सातबारा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे तर योग्य वेळ आल्यावर उत्तर देउ असे उमेश पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
उमेश पाटील यांनी सार्वजनिक ठिकाणी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्यांबद्दल मत मांडणे योग्य नसल्याचे जिल्हाध्यक्ष साठे यांनी म्हटले आहे. एखाद्याच्या खाजगी गोष्टीचे भांडवल करून आपल्याच पक्षाला अडचणीत आणण्याचे काम उमेश पाटील करीत आहेत. याबाबत वारंवार सांगूनसुद्धा त्यांनी पाटील यांना वैयक्तिक टार्गेट केले आहे. यामुळे पक्षाची बदनामी तर होत आहेच. शिवाय यामुळे अनेक लोक नाराज होउन पक्षापासून दूर जात आहेत. तोंडावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. हे असेच चालले तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार आहे. याचे भान ठेवून पदाधिकाऱ्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पण पक्षात उलटेच चालले आहे. यामुळे पक्षाची पीछेहाट होत असल्याची खंत साठे यांनी बोलून दाखविली.
दोन पाटलांच्या वादात आता आमदार यशवंत यांनी उडी घेतल्याचे निदर्शनाला आणल्यावर जिल्हाध्यक्ष साठे म्हणाले, आमदारांची भूमिका बरोबर आहे. पक्षवाढीसाठी माजी आमदार राजन पाटील यांचे योगदान मोठे आहे. मोहोळ तालुक्यात त्यांचे काम मोठे आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या कामावरून त्यांना टार्गेट करणे बरोबर नाही. त्यांनीही त्याच पद्धतीने उत्तर दिल्यावर काय राहणार आहे. एकमेकाच्या उकाळ्या पाकळ्या काढण्यामुळे पक्षाची मोठी बदनामी होत आहे.



















