काँग्रेसच्या ‘शहर मध्य’ मतदान टक्केवारी कमी का ; धोका कुणाला? ही धक्कादायक माहिती आली समोर
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण 59% इतके मतदान झाले. काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा जो शहर मध्य हा मतदारसंघ आहे. त्या एका मतदारसंघातून सगळ्यात कमी मतदान झाले आहे. सर्वाधिक मताधिक्य मिळण्याची अपेक्षा प्रणिती शिंदे यांना असलेल्या याच मतदारसंघातून इतके कमी मतदान का झाले अशी चर्चा आता सोलापुरात रंगू लागली आहे. त्यामुळे या मतदानाचा धोका कुणाला? काँग्रेसला अडचण होणार का? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.
शहर मध्य या मतदारसंघात सर्वाधिक मतदार म्हणून मुस्लिम समाजाची संख्या आहे. त्या खालोखाल मोची समाज, पद्मशाली समाज, भटका विमुक्त जाती समाज, आंबेडकरी समाज, लोधी समाज असे मतदार आहेत. यंदा भारतीय जनता पार्टीच्या इरशीवर मुस्लिम समाजाने काँग्रेसला मतदान केले आहे. मुस्लिम समाजाचे सर्वाधिक मतदार असतानाही कमी मतदान का झाले असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. परंतु खोलात जाऊन माहिती घेतली असता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मतदान कमी व्हायला मुस्लिम समाजातील राजकीय नेत्यांची गटबाजी कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. ‘मी भारी का तू भारी’ एकमेकांना कमी दाखवण्यात मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी पैसे घेतले म्हणून समाजात बातमी पसरली. एक रुपयाही न घेता आमची बदनामी का? चिडून काही मुस्लिम समाजातील युवा कार्यकर्त्यांनी बदला घ्यायचा ठरवले आणि घराघरात जाऊन पैसे वाटले, बोटाला शाई लावून मतदान करू नका असे सांगितले असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
ही नवीन आणि गंभीर बाब त्याच दिवशी माध्यमांसमोर यायला हवी होती. हे समजल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी शास्त्रीनगर, मौलाली चौक या परिसरात ठिय्या मांडला होता. या गोंधळामुळे किमान दहा हजार मतदान कमी झाल्याचे बोलले जात आहे. या कमी मतदानाचा फटका काँग्रेसला बसणार की याचा फायदा भाजपला होणार याकडे आता सोलापूरकरांच्या नजरा लागल्या आहेत.